टीम इंडियाच्या दौर्‍यामुळं मालामाल होणार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड, तब्बल 1560 कोटींच्या कमाईची शक्यता

सिडनी : वृत्तसंस्था – कोरोनामुळे जगातील सर्वच देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. ती पूर्ववत करण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू आहे. या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला सर्वांत मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, आता भारत दौऱ्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला कमाईची आशा वाटू लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या वार्षिक बैठकीत अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कोरोना काळात मोठा तोटा झाल्याची माहिती दिली. तसेच भारत दौऱ्यामुळे ऑस्ट्रेलियन बोर्डाचा आर्थिक गाडा रुळावर येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

एडिंग्ज यांच्या माहितीनुसार, वर्षभरापासून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड अनेक आव्हानांचा सामना करत आहे. कोरोनामुळे हे चित्र बदलेल की नाही अशी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, भारत दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. क्रिकेट अभ्यासकांच्या अंदाजानुसार टीम इंडियाच्या दौऱ्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला १ हजार ५६० कोटी रुपयांची कमाई मिळू शकते.

कोरोना काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेटला ६२० कोटींचा तोटा झाला आहे. २०२१ पर्यंत हा आकडा ८९० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात एकही आंतरराष्ट्रीय सामना न झाल्याने बोर्डाचे आर्थिक गणित बिघडलं आहे. आर्थिक गाडी रुळावर येण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला भारतीय संघाचा दौरा खूप मोठी मदत करणारा ठरणार आहे.

कसोटी रद्द होऊ न देण्याचे आव्हान
दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने नुकतंच आपल्या वार्षिक अहवालात ३ मिलिअन डॉलरचा (जवळपास २२ कोटी रुपये) तोटा झाल्याचं नमूद केलं होतं. एडलेट कसोटीतून चांगल्या कामाची क्रिकेट असोसिएशनला अपेक्षा आहे. त्यामुळे एडलेट कसोटी रद्द होऊ न देण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियन प्रशासनासमोर आहे.

सामन्यासाठी सिडनीत तयारी सुरू
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी – २० सामने खेळले जाणार आहेत. त्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. सिडनीतील स्टेडियम अर्ध्या क्षमतेपर्यंत भरेल इतकी तिकीट विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रेक्षकांना फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

You might also like