‘कोरोना’ची लस घेणे म्हणजे ‘हराम’, ऑस्ट्रेलियातील इमामचा दावा

पोलिसनामा ऑनलाईन – ऑस्ट्रेलियातील एका इमामने कोरोनाची लस न घेण्याचे आवाहन केले आहे. लस घेणे म्हणजे इस्लामच्या दृष्टीने हराम असल्याचा दावाही या इमामने केला आहे. ऑक्सफर्ड आणि अस्त्राझेनेका तयार करत असलेली कोरोना लस मुस्लिमांनी घेऊ नये असे त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

पर्थ येथील मशीदीमध्ये प्रार्थना सांगणारे इमाम सुफियान खलीफा यांनी युट्यूबवर मुस्लिमांना आवाहन करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन मुस्लिमांनी एकत्र येण्यासाठी संदेश दिला असून प्रेषितांचा मार्ग निवडा, अशा मथळ्याचा व्हिडिओ या इमामने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये कोरोनाचा लस बनवण्यासाठी कंपनीने कोणत्या पद्धतीचा वापर केला आहे याबद्दलची माहिती देत असल्याचे सांगण्यात आले आहे. लस वापरण्याचे समर्थन करणार्‍या काही मुस्लिम संस्थांची लाज वाटते. यासंदर्भात फतवा जारी करणार्‍या कोणत्याही इमामाचा निषेध असो, असे म्हणतच या व्हिडिओमध्ये खलीफाने लसीला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. ही लस म्हणजे हराम असल्याचे ठाऊक असल्यानेच कॅथलिक याविरोधात उभे राहिल्याचे दिसत आहे. हे कायद्याच्या विरोधात आहे. मात्र तुम्ही याबाबतील सरकारबरोबर उभे राहण्याचा निर्णय घेत असला तर विचार करा, असं पर्थमधील हा इमाम व्हिडिओत बोलताना दिसतो.