Coronavirus : ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी 48 तासात नष्ट केला ‘कोरोना’ व्हायरस, ‘या’ औषधानं केली ‘कमाल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आज जवळजवळ संपूर्ण जग कोरोना विषाणू साथीच्या आजाराने ग्रस्त आहे. आतापर्यंत यात 11 लाखाहून अधिक लोकांना लागण झाली आहे, तर 61 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे हा विषाणू नवीन आहे. म्हणून सध्या तरी या विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही आणि कोणतेही विशिष्ट उपचार देखील नाही. संपूर्ण जगातील वैज्ञानिक या विषाणूच्या उपचारावर आणि लसीवर काम करत आहेत आणि अशातच आशेचा एक किरण चमकत असल्याचे दिसत आहे. वास्तविक ऑस्ट्रेलियामधील वैज्ञानिक याचा तोड शोधण्याच्या अगदी जवळ आले आहेत.

परजीवी मारणार्‍या औषधाची कमाल

ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या सेलमधून अवघ्या 48 तासांत विषाणूचा खात्मा केला आहे आणि तेदेखील आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या औषधाने. संशोधकांना असे आढळले आहे की जगात आधीपासूनच उपलब्ध असणाऱ्या एका परजीवी विरोधी औषधाने कोरोना विषाणूचा नाश केला आहे. कोरोना विषाणूच्या उपचारामध्ये ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे आणि यामुळे आता क्लिनिकल चाचण्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

औषधाच्या फक्त एका डोसने 48 तासात कोरोनाचा खात्मा!

अँटी-व्हायरल रिसर्च जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, इव्हर्मेक्टिन नावाच्या औषधाचा केवळ एक डोस 48 तासांत कोरोना विषाणूसह सर्व व्हायरल आरएनए नष्ट करू शकतो. जर संसर्गाचा कमी परिणाम झाला असेल तर 24 तासांत विषाणूचा अंत होऊ शकतो. वास्तविक, आरएनए व्हायरस अशा विषाणूंना म्हटले जाते, ज्यांच्या अनुवंशिक सामग्रीमध्ये आरएनए म्हणजेच रिबो न्यूक्लिक अ‍ॅसिड असते. हा अभ्यास ऑस्ट्रेलियाच्या मोनाश युनिव्हर्सिटीच्या कायली वॅगस्टाफ यांनी इतर शास्त्रज्ञांसह लिहिला आहे.

हे औषध आधीच इतर अनेक प्रकारच्या विषाणूंवर वापरले जाते

या संशोधनात शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की इव्हर्मेक्टिन एक परजीवी विरोधी औषध आहे, जे एचआयव्ही, डेंग्यू, इन्फ्लुएंझा आणि झिका विषाणूसारख्या सर्व विषाणूंविरूद्ध प्रभावी आहे. तथापि, वागस्टाफने असा इशारा देखील दिला आहे की हा अभ्यास प्रयोगशाळेत करण्यात आला आहे आणि लोकांवर त्याची चाचणी घ्यावी लागेल.

इव्हर्मेक्टिन हे एक सुरक्षित औषध मानले जाते

वागस्टाफ म्हणाले, ‘इव्हर्मेक्टिनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि हे एक सुरक्षित औषध मानले जाते. आता हा डोस मनुष्यांमध्ये (कोरोना विषाणूविरूद्ध) प्रभावी ठरतो की नाही हे पाहण्याची गरज आहे. आता हा पुढचा टप्पा आहे.’ तसेच ते पुढे म्हणाले, ‘सध्या आपण जागतिक साथीच्या रोगाशी झटत आहोत आणि त्याचा अद्याप कोणताही उपचार सापडलेला नाही, तेव्हा आमच्याकडे हे औषधांचे मिश्रण आधीच उपलब्ध असल्याने ते लोकांना लवकर मदत करेल.’

क्लिनिकल चाचणीचा मार्ग होऊ शकतो मोकळा

कोरोना विषाणूवर इव्हर्मेक्टिन कसे कार्य करते याबद्दल अचूक तपशील माहित नसला तरीही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे औषध ज्या प्रकारे इतर विषाणूंवर कार्य करते, त्याच प्रकारे ते कोरोनावर देखील कार्य करेल. इतर विषाणूंमधे हे औषध प्रथम होस्ट पेशीं (अशा पेशी ज्या प्रथम संक्रमणाच्या शिकार झाल्या आहेत आणि त्यांच्यापासून इतर पेशींमध्ये संक्रमण झाले आहे) मधील विषाणूचा प्रभाव काढून टाकते.

परंतु सध्या करावी लागेल प्रतीक्षा

या अभ्यासाचे आणखी एक सह-लेखक रॉयल मेलबर्न हॉस्पिटलचे लिओन कॅले म्हणाले की कोरोना विषाणूच्या या संभाव्य औषधाबद्दल ते खूप उत्सुक आहेत. तथापि, त्यांनी खबरदारी घेतली की प्री-क्लिनिकल चाचणी आणि त्यानंतरच्या क्लिनिकल चाचण्यांचे टप्पे अजून बाकी आहेत. या चरणांचा परिणाम बघिल्यानंतरच इव्हर्मेक्टिनचा उपयोग कोरोना विषाणूच्या उपचारात केला पाहिजे.