खुशखबर ! स्वस्त होऊ शकतात दुचाकी वाहने, सरकारनं दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी वाहनांसाठी वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरात कपातीचे संकेत दिले. त्यांनी मोटर वाहन उद्योगाला लवकरच चांगली बातमी मिळण्याची आशा व्यक्त केली. जावडेकर यांनी म्हटले की, वाहनांच्या भंगार धोरणाचा प्रस्ताव तयार झाला आहे आणि सर्व संबंधित पक्षांनी त्यावर मत दिले आहे. लवकरच या धोरणाची घोषणा होऊ शकते.

जावडेकर यांनी वाहनांसाठी जीएसटी दरात कपातीच्या शक्यतेबाबत म्हटले की, अर्थ मंत्रालय प्रस्तावावर काम करत आहे. याबाबत सर्व माहिती सध्या उपलब्ध नाही. अंदाजानुसार दुचाकी वाहने, तिनचाकी वाहने, सार्वजनिक वाहतूक वाहनांची वेगळी श्रेणी तसेच यानंतर चार चाकी वाहने असा क्रम असू शकतो. मला आशा आहे की तुम्हाला लवकरच काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल. जावडेकर म्हणाले, जीएसटी दर कमी करण्याच्या वाहन उद्योगाच्या मागणीवर मी निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याशी चर्चा करणार आहे. ताबडतोब जीएसटी दर घटवण्यावर सहमती झाली नाही तरी हा अंतिम नकार नसेल. आशा आहे की, पुढे एखादा मार्ग निश्चित मिळेल, जो मला दिसत आहे आणि या दिशेने प्रगती होईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील महिन्यात उद्योग जगतासोबत केलेल्या चर्चेत म्हटले होते की, दुचाकी वाहने लग्झरी वाहने नाहीत आणि नुकसानकारक वस्तू सुद्धा नाहीत, त्यामुळे जीएसटी दरात दुरूस्ती केली जाऊ शकते. जीएसटी परिषदेद्वारे एक दर दुरूस्ती प्रस्ताव आणला जाईल. दुचाकी वाहनांवर सध्या 28 टक्के जीएसटी लावता जातो. केंद्रीय मंत्र्यांनी वाहन उत्पादक कंपन्यांच्या संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सच्या 60 व्या वार्षिक संमेलनात म्हटले की, सरकार सर्व हितधारकांसोबत मिळून काम करत आहे, जेणेकरून मागणी प्रोत्साहन मिळू शकेल.