‘हार्ट अटॅक’च्या प्राथमिक उपचारासाठी मुंबई पोलीसही सज्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आता मुंबई पोलीस हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीलाही प्राथमिक मदत देऊ शकतात. यामुळे वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्या व्यक्तीचे प्राण वाचवता येऊ शकतात. यासाठी वांद्रे ते अंधेरी या भागातील १० पोलीस स्टेशनला आटोमॅटेड एक्स्टर्नल डेफिब्रिलॅटर्स (एईडी) दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर लोकांचे प्राण वाचवतील.

एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला असेल, तर वेळीच औषधोपचाराने जीव वाचवता येऊ शकतो. हार्ट अटॅक आला असताना, आपात्कालीन परिस्थितीत पहिला एक तास म्हणजेच गोल्डन अवर खूप महत्त्वाचा असतो. म्हणून वांद्रे, खार, सांताक्रुझ, डी. एन. नगर यांसारख्या पोलीस ठाण्यात हे आटोमॅटेड एक्स्टर्नल डेफिब्रिलॅटर्स (एईडी) देण्यात आले आहेत.

सामाजिक संघटना आणि डॉक्टरांच्या मदतीने आम्ही पोलिसांनाआटोमॅटेड एक्स्टर्नल डेफिब्रिलॅटर्स (एईडी) कसे वापरायचे याचं प्रशिक्षण दिलं आहे. पोलीस नेहमीच पेट्रोलिंग करतात. बीट मार्शल नेमून दिलेल्या भागात गस्तीवर असतात. त्यांना खासकरून हे ट्रेनिंग देण्यात आलं आहे. जेणेकरून पोलीस एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा वाचवतील. लोकांनी जर कंट्रोल रूमला फोन केला तरीही मुंबई पोलीस धावून जातील.

मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हजारो लोकं जुहू, सांताक्रुझ चौपाटीला फिरण्यासाठी येतात. कार्टर रोड सारख्या मार्केटमध्ये शॉपिंगसाठी नेहमीच गर्दी असते. आपात्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते. अशा काही घटना याआधी घडलेल्या आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला रस्त्यातच हार्ट अटॅक आला आणि वैद्यकीय मदतीची गरज आहे. म्हणून हे डेफिब्रिलॅटर्स १० पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले आहेत.