ई-बाईक झाली आणखी पॉवरफुल ; कापणार दुप्पट अंतर

दोन बॅटरींवर चालणारी ई-स्कूटर लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाढते शहरीकरण, औद्योगिकरणामुळे दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या अन् त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्या हे एक दुष्टचक्र आहे. त्यावर इलेक्ट्रिक वाहन हा नवीन उपाय पुढे आला आहे. इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी जवळपास सर्वच कंपन्या सरसावल्या आहेत. विजेवर चालणारी वाहने यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शोधले जात आहेत. अवान मोटर्सने नवा ‘ट्रेंड ‘ई’ ही इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. सिंगल आणि डबल अशा दोन बॅटरीच्या पर्यायासह नवी ई-स्कूटर कंपनीने बाजारात आणली आहे. ही नवीन स्कूटर या कंपनीची Xero श्रेणीतील तिसरी स्कूटर आहे. याआधी कंपनीने Xero आणि Xero प्लस अशा दोन स्कूटर बाजारात आणल्या होत्या.

अशी आहे अवान ट्रेंड ई-स्कूटर –
अवान ट्रेंड ई-स्कूटरच्या समोरील बाजूस डिस्क आणि रिअरला ड्रम ब्रेक दिले आहेत. स्कूटरमध्ये हॅड्रोलिक टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि कॉइल स्प्रिंग रिअर सस्पेन्शन दिले आहेत. स्कूटरवर मागे बसणाऱ्यासाठी आरामदायक सीट देण्यात आली आहे. सीटच्या आतमध्ये आणि समोरील बाजूस पॅनलजवळ वस्तू ठेवण्यासाठी जागा, तसेच बॉटल होल्डरसाठी वेगळी जागा ठेवण्यात आली आहे. इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये ‘स्मार्ट की’ फिचर देण्यात आले आहे, जे कारसारखी लॉकची सुविधा देते.

अवानच्या या नव्या इलेक्ट्रीक स्कूटरची एक बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर ६० किमी आणि दोन बॅटरींची स्कूटर ११० किमीचे अंतर कापू शकणार आहे. स्कूटरमध्ये लिथिअम आयन बॅटरी देण्यात आली असून ती २ ते ४ तासात चार्ज होते. या स्कूटरची टॉप स्पीड ४५ किमी प्रतीतास आहे. तर १५० किलोचे वजन ही स्कूटर वाहून नेऊ शकणार आहे.

सिंगल बॅटरी असलेल्या ई-स्कूटरची एक्स शोरूमची किंमत ५६,९०० रुपये आणि डबल बॅटरी असलेल्या ई-स्कूटरची एक्स शोरुमची किंमत ८१,२६९ रुपये आहे. ही ई-स्कूटर लाल-काळी, काळी-लाल, सफेद-निळी अशा तीन प्रकारच्या रंगात उपलब्ध आहे.

Loading...
You might also like