अवनीचे बछडे सहा-सात दिवसांपासून उपाशीच

अमरावती : पोलिसनमा ऑनलाइन – पांढरकवड्यातील अवनी म्हणजे टी १ वाघिणीला गोळया घालून ठार करण्यात आले. आता तिच्या बछड्यांची हेळसांड सुरू असून ते तब्बल सहा-सात दिवसांपासून उपाशी आहेत. अशी उपासमार झाल्यास ते मृत्यू पावण्याची भीती व्यक्त होत आहे. वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश दिल्यानंतर तिच्या बछड्यांचाही प्रश्न होता. मात्र यासंदर्भात उपवनसंरक्षक आणि मुख्य वनसंरक्षक यांनी दिलेल्या आदेशात प्रचंड विरोधाभास असल्याचे उघड झाले आहे.

वाघिणीच्या बछड्यांना शिकार करण्यास शिकण्यासाठी किमान दोन महिन्यांचा तरी कालावधी लागतो. तोपर्यंत वाघिणीने केलेल्या शिकारीवर आणि तिच्या दुधावर त्यांचे पोट भरत असते. या वाघिणीने २९ ऑक्टोबरला अखेरची शिकार केली होती. तेव्हापासून तिने एकही शिकार केलेली नाही. त्यामुळे तिचे बछडे देखील तेव्हापासूनच उपाशी आहेत. त्यांना खाऊ घालण्यासाठी ते सापडायला हवेत आणि सापडले तरी त्यांना जेरबंद करता यायला हवे. आणखी दोन-चार दिवसात त्यांना खायला मिळाले नाही आणि बछडे निदर्शनास आले नाही तर मात्र, उपाशी राहिल्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वाघिणीला जेरबंद करण्याच्या एका आदेशात आधी वाघिणीला पकडून मग बछड्यांना पकडायचे असे म्हटले होते तर दुसऱ्या आदेशात आधी बछड्यांना पकडून मग वाघिणीला पकडायचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनीही आधी बछड्यांना जेरबंद करा आणि नंतर वाघिणीला पकडा असे स्पष्टपणे म्हटले होते. मात्र, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वनखात्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडेही डोळेझाक केली. ही मोहीम सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच सर्व लक्ष त्या वाघिणीवर केंद्रीत करण्यात आले होते. त्या वाघिणीला नऊ-दहा महिन्यांचे बछडे आहेत हे देखील वनखाते विसरुन गेले.