दोन दिवसात ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ची भारतातील ‘एवढी’ कमाई, बाहुबलीचे रेकॉर्ड मोडीत

मुंबई : वृत्तसंस्था – हॉलिवूडपट ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ शुक्रवारी भारतामध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने दोनच दिवसात कोटीच्या कोटी उड्डाणे घेत कमाईचे रेकॉर्ड तोडले आहे. भारतात प्रदर्शित झाल्यानंतर शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात या चित्रपटाने ५० कोटीहून अधिक रुपयांची कमाई करत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ या चित्रपटासारखी कमाई आत्तापर्य़ंत कोणत्याच हॉलिवूडपटाने केली नाही.

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट भारतामध्ये चार भाषेत प्रदर्शित झाला आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये १०४. ५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर इतर भाषांमधील कमाई १२४ कोटी रुपये आहे.

दक्षिणेतील सुपर स्टार प्रभास याचा बाहुबली आणि बाहुबली -२ या चित्रपटांनी केलेल्या कमाईचे रेकॉर्ड ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने मोडीत काढून कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बाहुबली या चित्रपटाने १०० कोटी रुपये तर बाहुबली -२ या चित्रपाटाने १०० कोटी रुपयांची कमाई केली होती.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी तब्बल ५३.१० कोटी रुपये कमावले. तर शनिवारी दुसऱ्या दिवशी ५१.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट भारतामध्ये २ हजार ८४५ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.