रेडी रेकनर दर वाढीचा प्रस्ताव !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्चपासून राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यामुळे दरवर्षी १ एप्रिलपासून लागू होणारे रेडी रेकनरचे ( ready reckoner)  दर २०२० मध्ये लागू करण्यात आले नाहीत. वाढ करण्यास शासनाने स्थगिती दिल्यामुळे जुनेच दर कायम ठेवण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर २०२० पासून राज्य शासनाने रेडी रेकनरमध्ये ( ready reckoner)  वाढ दिल्याने नवे दर लागू करण्यात आले होते.

दरम्यान, राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रेडी रेकनरच्या दारात विविध सवलती दिल्या आहेत. तर पुढील आर्थिक वर्षात (२०२१-२२) पुणे शहरातील रेडी रेकनरच्या (वार्षिक बाजारमूल्य दर) दरात सरासरी ५ टक्के वाढीचा प्रस्ताव तयार केला असल्याचे समजते. तर ग्रामीण भागात २ टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासन त्यावर काय निर्णय घेणार, त्यावर ही वाढ लागू होणार की नाही, हे ठरणार आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी एक एप्रिल रोजी रेडी रेकनरचे दर नव्याने लागू करण्यात येतात. त्यानुसार मुद्रांक शुल्क विभागाने पुढील आर्थिक वर्षाच्या रेडी रेकनरचे नवे दर प्रस्तावित केले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली. ही सवलत येत्या ३१ मार्चपर्यंतच आहे. दरम्यान मुद्रांक शुल्क विभागाने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचे रेडी रेकनरचे दर तयार करण्याचे पूर्ण झाले आहे. यासाठी मागील वर्षभरात झालेल्या व्यवहारांच्या सरासरीवर नवे दर प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये शहरी भागात सरासरी ५ टक्के तर ग्रामीण भागात सरासरी २ टक्के इतकी वाढ प्रस्तावित केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पुण्यातील रेडी रेकनरमधील वाढ

वर्ष – रेडी रेकनरमधील वाढ
२०१७-१८ – ३.६४ टक्के
२०१८-१९ – वाढ नाही
२०१९-२० – वाढ नाही
२०२०-२१ – १.२५ टक्के
२०२१-२२- ५ टक्के (प्रस्तावित)

ग्रामीण भागातील वाढ

वर्ष – रेडी रेकनरमधील वाढ
२०१७-१८- १५.३० टक्के
२०१८-१९ – वाढ नाही
२०१९-२० – वाढ नाही
२०२०-२१ – ८.६२ टक्के
२०२१-२२ – २ टक्के (प्रस्तावित)