पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Avinash Dharmadhikari | एकसंध राष्ट्रीयत्व ही भारताची खरी ताकद आहे. वेगवेगळ्या मार्गांनी भारत तोडण्याचे प्रयत्न सुरू असले तरी आपले राष्ट्रीयत्व बळकट करू या. कारण जगाला सुख, शांती, समाधान देण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत धर्माधिकारी बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्याख्यानमालेचे यंदा तिसरे वर्ष होते.
‘भारत तोडो षडयंत्र’ या विषयावर मार्गदर्शन करताना धर्माधिकारी म्हणाले, भारताचा सनातन विचार हाच जगातील सर्वात सहिष्णु विचार आहे. हा सर्व जगाला जोडणारा विचार आहे. विश्वालाच कुटुंब मानणे ही भारताची संकल्पना आहे. भारत एकसंध राहू नये म्हणून परकीय शक्ती आणि त्यांना मदत करणाऱ्या भारतातील शक्ती भारत तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉ. करमळकर म्हणाले, भारत तोडण्याचे जे कारस्थान सुरू आहे, ते समजून घेणे, त्याची माहिती घेणे आवश्यक आहे.
व्याख्यानमालेचे द्वितीय सत्र प्रसिद्ध निरूपणकार, लेखक विवेक घळसासी यांनी गुंफले. ‘भारताच्या वैभवाचा आधार – माझं घर माझा परिवार’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि कायदेतज्ज्ञ डी. डी. शहा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. घळसासी म्हणाले, आपल्या देशाला आपल्याला परमवैभवाला न्यायचे आहे आणि हे काम इतरांनी नाही तर मला माझ्यापासून, माझ्या घरापासून करायचे आहे. देशाला परमवैभवाला नेणे ही माझी जबाबदारी आहे, हे प्रत्येकाला लक्षात ठेवावे लागेल.
स्वतः विषयीचा आत्मविश्वास, कृतज्ञता, सर्वसमावेशकता, सहभागीता, संयम, श्रमप्रतिष्ठा, उत्तम अभिव्यक्ती, अनुशासन, त्याग, तपस्या ही तत्त्व आपल्याला अंगी बाणवावी लागतील. मुळात उत्तम माणूस घडला तर देश उभा राहील. हा माणूस घरात म्हणजेच कुटुंबात संस्कारातून घडेल. म्हणून माझं घर – माझा परिवार हा वैभवशाली भारताचा आधार आहे, असेही घळसासी यांनी सांगितले. व्याख्यानमालांसारख्या कार्यक्रमांची समाजाला गरज आहे. म्हणून असे कार्यक्रम सातत्याने करत राहणे आवश्यक आहे, असे मृणाल कुलकर्णी म्हणाल्या.
संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी सत्कार आणि स्वागत तर नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#
Hadapsar Pune Crime News | आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण; पुणे शहरात खळबळ