भारताविरोधात लष्करी कारवाई करू नका ; अमेरिकेनं केली पाकिस्तानची कानउघडणी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर चीनने पाकिस्तानला पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर दाबावाखाली असलेल्या पाकिस्तानेचे अमेरिकेनेही कान टोचले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे हे गरजेचे आहे. त्यामुळे भारताविरोधात लष्करी कारवाई टाळावी. तसंच पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, असंही अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर देणार, असं पाकिस्तानकडून सांगण्यात आले.

भारत– पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दुरध्वनीवरुन संवाद साधला. त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केले आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली. तणाव कमी करण्यासाठी लष्करी कारवाई टाळावी आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई करावी, असे त्यांनी पाकला सांगितले. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी लष्करी कारवाई टाळून थेट चर्चा करावी, असे देखील अमेरिकेने म्हटले आहे.

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली. संरक्षण संदर्भातील सहकार्य आणि या भागातील शांतता कायम रहावी, यासंदर्भात चर्चा झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.