‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख टाळून सार्वजनिक स्थळांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे नामकरण करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मधील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यापाठोपाठ नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवरील देखील गुन्हे मागे घेण्याबाबत पसंती दर्शवली होती. त्यानंतर आता मराठा आरक्षणातील आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घ्यावेत तसेच कोल्हापुरातील शिवाजी विद्यापिठासहित महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे करावे अशी मागणी भाजपचे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबतचे एक पत्र देखील संभाजी महाराजांनी उद्धव ठाकरेंना लिहिले आहे ज्यामध्ये ते म्हणतात, काही दिवसांपूर्वी महाराजांच्या नाव उच्चारावरून मोठी चर्चा झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे जनमानसात किती मोठे स्थान आहे हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचे केबीसी प्रकरण असो किंवा रविशंकर प्रसाद वक्तव्य या दोनीही वेळी शिवभक्तांनी जाब विचारला होता. मात्र आता याबाबत कायमस्वरूपी उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे मत संभाजी महाराजांनी व्यक्त केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणी दरम्यान अनेकांवर विनाकारण गुन्हे दाखल केले गेले आहेत त्यामुळे हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. तसेच अनेक स्थळांच्या नावामध्ये केवळ शिवाजी महाराज असा उल्लेख असून त्याचे नामकरण आता छत्रपती शिवाजी महाराज असे करावे अशी थेट मागणी संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर अनेक दलित युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे देखील मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावेत यासाठी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील यावेळी झालेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. तसेच प्रकाश गजभिये यांनी देखील या आधी दंगली नंतर झालेल्या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांवर टाकलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

Visit : policenama.com