चेहरा स्वच्छ करताना घ्या ‘ही’ काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चेहरा सतत धुतल्यानंतर त्वचा चांगली राहते असा अनेकांचा समज आहे. मात्र वारंवार चेहरा धुणे हे चांगले नाही. कामासाठी बाहेर जाताना आणि कामावरून आल्यानंतर चेहरा धुतल्यास हरकत नाही. दिवसातून ४ वेळा चेहरा धुणे ठिक असले तरी त्यापेक्षा जास्त वेळा चेहरा धुवू नये. उन्हाळ्यात घाम आणि उन्हाने चेहरा तेलकट होत असल्याने तो स्वच्छ ठेवावा. बाहेरून घरी आल्यानंतर चेहऱ्यावरील धूळ आणि तेल दूर करण्यासाठी चेहरा धुवावा. चेहरा धुताना काय काळजी घेतली पाहिजे.

चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने तो घासू नये. यामुळे इरिटेशन आणि रेडनसचा त्रास होऊ शकतो. कोरड्या कपड्याने चेहऱ्यावरील पाणी अलगद टीपून घ्यावे. चेहरा पुसण्यासाठी नेहमी स्वच्छ टॉवेल वापरावा. वापरलेल्या टॉवेलवर बॅक्टेरिया असू शकतात. तसेच चेहरा पुसण्यासाठी बेबी टॉवेल वापरावा. कारण यामुळे त्वचेला हानी पोहोचत नाही. चेहरा धुण्यासाठी त्वचेला योग्य असे क्लिनझर वापरावे. त्वचा नॉर्मल टू ड्राय असेल तर हायड्रेटिंग आणि क्रिमी क्लिनझर वापरावे. त्वचा संवेदनशील असेल तर जेंटल क्लिनझर वापरावे. साबण वापरणे टाळावे. त्वचा ऑईली असल्यास सॅलिसिलिक असिडयुक्त फेसिअल वॉश वापरावा. कॉम्बिनेशन स्किन असेल तर फोमिंग किंवा जेल क्लिनझर वापरावे. क्लिनझर वापरण्याचीदेखील एक पद्धत असते.

तुम्ही क्लिनझिंग लोशन वापरत असाल तर मॉईश्चरायझरप्रमाणे ड्राय स्किनवर काही मिनिटे चोळावे. जेल किंवा फोम्स वापरत असाल तर सुरुवातीला चेहरा ओला करून मग वापरावे. अक्नेसाठी क्लिनझर वापरत असल्यास काही वेळ चेहऱ्यावर क्लिनझर तसेच राहू द्यावे आणि त्यानंतर धुवावे. चेहरा धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नये. गरम पाण्यामुळे चेहऱ्याच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन चेहरा लासर आणि कोरडा होतो. यासाठी नेहमी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छा करावा.