सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ उत्साहात संपन्न

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात 22 फेब्रुवारी 2019 रोजी पदवीप्राप्त विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा महाविद्यालयात संपन्न झालेला प्रथम पदवीप्रदान समारंभ होता. या समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. शाळीग्राम भंडारी हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष यादवेंद्रजी खळदे साहेब हे होते. या कार्यक्रमासाठी मावळ शिक्षण प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. कृष्णकांत वाढोकर व सदस्य प्रा. वसंत पवार यांची विशेष उपस्थिती होती. वाणिज्य शाखेच्या पंधरा व कला शाखेच्या तीन विद्यार्थीनींना या समारंभात पदवीप्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर व पदवीप्रदान करण्यात येणार आहे अशा विद्यार्थीनी मिरवणूकीने सभागृहात दाखल झाल्या. समारंभाचे प्रमुख पाहुणे डाॕ. शाळीग्राम भंडारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी उत्तम आरोग्याची गरज असते. उत्तम आरोग्य असेल तर आपले कोणतेही स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता कमी असते असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवेंद्रजी खळदे यांनी पदवीप्राप्त विद्यार्थीनींनी महाविद्यालयात प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या जोरावर उच्चपद प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव रोशन करावे असे मत मांडले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रास्तविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डब्ल्यू. मिसाळ सर म्हणाले की, महाविद्यालयाचा उन्नतीचा आलेख असाच प्रगतीपथावर राहिल. जास्तीत जास्त विद्यार्थीनी पदवी प्राप्त करून महाविद्यालयातून बाहेर कशा पडतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. यानंतर स्नातकांना पदवीप्रदान करण्याची विनंती महाविद्यालयीन परीक्षाधिकारी प्रा. सोमनाथ कसबे यांनी मान्यवरांना केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भागवत देशमुख यांनी केले. आभार प्रा. योगीता शिंदे यांनी मानले. पदवीप्राप्त झालेल्या विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावर पदवीप्राप्तीचा आनंद दिसून येत होता. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनींनी सहकार्य केले.