१०० टक्के प्लाॅस्टिक बंदी करणाऱ्या स्थानिक संस्थेला लाखाेंचं बक्षीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात १०० टक्के प्लाॅस्टिक बंदी करण्यासाठी लाखोंचे बक्षीस जाहिर करण्यात आले आहे. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर राज्य सरकारने स्थानिक स्तरावर अंमलबजावणी व्हावी यासाठी महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी शंभर टक्के प्लाॅस्टिक बंदी केल्यास हे बक्षीस देण्यात येणार आहे.अशी घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीर केली.

याबाबत सर्विस्तर वृत्त असे की, शंभर टक्के प्लॅस्टिक बंदी करणाऱ्या राज्यातील महानगरपालिकेला २५ लाख, नगरपरिषदेला १५ लाख, तर सहा महसूल विभागातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचं पारितोषिक पर्यावरण दिनी देण्यात येईल, अशी घोषणे दरम्यान पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यातील पर्यावरण विषयक पारितोषिक वितरण कार्यक्रमात रामदास कदम बोलत होते. यावेळी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, अपर मुख्य सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्‌बलगन उपस्थित होते.

दरम्यान, रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत विचार देखील सुरु असुन, त्याबाबत गांभीर्याने विचार सुरु असल्याचं कदम यांनी सांगितलं. शेतीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे अन्न-धान्यामध्ये विषारी घटकांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे कुटुंबातील अनेकांना वेगवेगळे जिवघेणे आजार जडले आहेत. म्हणूनच प्लॅस्टिक बंदीनंतर आता रासायनिक खते वापरण्यावरही बंदी आणण्यासाठी पर्यावरण विभाग विचार करत असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.

संपूर्ण जगाने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील जनतेलाही प्लॅस्टिकच्या परिणामांची जाणीव झाली असून नागरिक स्वत:हून प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगचा त्याग करुन कापडी पिशव्या वापरत आहेत. नद्या, समुद्र, समुद्रकिनारे प्लॅस्टिकच्या वस्तूने भरले आहेत. त्याचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच जैवविविधतेवर होत आहे. कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढलं आहे. तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दुष्काळाला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे, याविषयी देखील रामदास कदम यांनी खंत व्यक्त केली.