‘मोदीजी, लष्करात जात, धर्म आणि प्रादेशिकवाद घुसवू नका’, ‘त्या’ विधानावरून जितेंद्र आव्हाडांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटन करताना गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या त्या विधानावरून गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. लष्करातील सर्व जवान भारतीय आहेत, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या बिहार रेजिमेंटचा उल्लेख करत बिहारमधील नागरिकांनी त्यांच्या पराक्रमाचा अभिमान बाळगावा असं आवाहन केलं होतं. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. मराठा रेजिमेंटमधील सर्व जवान मराठा नाहीत. गोरखा रायफल्समधील सर्व जवान गोरखा नाहीत. मद्रास रेजिमेंटमधील सर्व जवान तामिळ नाहीत. त्याच प्रमाणे बिहार रेजिमेंटमधील सर्व जवान फक्त बिहारमधील नाहीत. लष्करात जात, धर्म आणि प्रादेशिकवाद घुसवू नका. मोदीजी सर्व जवान हे भारतीय आहेत, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण रोजगार अभियानाचा शुभारंभ बिहारमधून केला. अभियानेचे उद्घाटन करताना मोदी यांनी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला होता. लडाखमध्ये लष्करानं केलेला पराक्रम बिहार रेजिमेंटचा आहे. प्रत्येक बिहारी नागरिकाने याचा अभिमान बाळगायला पाहिजे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. गलवान खोऱ्यात 15 जून रोजी झालेल्या संघर्षामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. शहीद झालेले जवान हे बिहार रेजिमेंटमधील होते.