नायजेरियन हॅकरने अ‍ॅक्सिस बँकेतुन लुटले सव्वा 2 कोटी अन् 117 खात्यात केले ट्रान्सफर, पण…

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –   धुळे (Dhule) शहरातील अ‍ॅक्सिस बँकेतील (Axis Bank) बँक खाते हॅक (Bank Account Hack) करुन दोन कोटी 6 लाखाची रक्कम लंपास करणाऱ्या दिल्ली (Delhi) येथील टोळीचा धुळे पोलिसांनी (Dhule Police) पर्दाफाश केला आहे. धुळ्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्य पथकाने (LCB) राजधानी दिल्लीत कारवाई करत एका नायजेरियन हॅकरसह (Nigerian Hacker) पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील अ‍ॅक्सिस बँकेतील धुळे विकास बँकेच्या चालू खात्यातून 9 जून 2020 रोजी अज्ञात हॅकर्सने दोन कोटी 6 लाख 50 हजार 165 रुपये लांबविले होते. यानंतर शाखाधिकारी धनेश सगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करुन या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

सुरुवातीला हॅकर्सने रक्कम 18 बँकांच्या 27 खात्यांमध्ये वर्ग केली. त्यानंतर ही रक्कम 27 खात्यातून 69 खात्यात व तेथून 21 खात्यात अशा प्रकारे देशभरातील सुमारे 117 विविध बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली होती. परंतु, पोलिसांनी वेळीच ही खाती गोठवून 88 लाख 81 हजार 173 रुपये थांबविले. तपासात पोलिसांना एका संशयिताचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्या मोबाइलच्या आधारे पोलिसांनी दिल्लीतील नितीका दीपक चित्रा (वय-30 रा. जुने महाविर नगर, नवी दिल्ली) हिला ताब्यात घेऊ सखोल चौकशी केली. यानंतर या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, नितीकाचा पती दीपक राजकुमार चित्रा (वय-29 रा. नवी दिल्ली) हा टोबॅचिकू जोसेफ ओकोरो उर्फ प्रेस (वय-23 रा. ग्रेट नोएडा, यू.पी.) नावाच्या नायजेरियन व्यक्तीच्या संपर्कात होता. प्रेस हा देशभरातील कोणत्याही बँकेचे खाते हॅक करुन त्यातील रक्कम विविध बँक खात्यात ट्रान्सफर करायचा आणि दीपक, नितीका चित्रा, रमनकुमार दर्शनकुमार (वय-30 रा. तिलक नगर, दिल्ली), अवतारसिंग उर्फ हॅप्पी वरेआमसिंग (वय-28 रा. तिलकनगर, नवी दिल्ली) यांच्या मदतीने सर्वसामान्य लोकांकडून केवायसी कागदपत्र घेऊन विविध बँकांमध्ये बनावट खाते उघडायचे. त्यानंतर त्या खात्यातून पैसे काढायचे. अशा प्रकारे ही टोळी कार्यरत असल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, उमेश बोरसे, सारीका कोडापे, हनुमान उगले, हवालदार संजय पाटील, अशोक पाटील, संदीप पाटील व सायबर तज्ज्ञ व्रजेश गुजराथी यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने या गुन्ह्याची उकल केली.

You might also like