ठाकरे सरकारची Axis बँकेवर कृपा ! अखेर राज्य शासनाच्या यादीत समावेश, अमृता फडणवीसांवर करत होते टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युतीच्या काळात Axis बँकेला झुकते माप देण्यात आल्याची जोरदार टीका सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांनी केली होती. मात्र सध्या राज्याच्या वित्त विभागाने ज्या १५ खासगी बँकांना (Private bank) शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची परवानगी दिलीय त्यामध्ये Axis बँकेचा देखील समावेश करण्यात आला आहे.

वित्त विभागाने गुरुवारी एक आदेश जारी करून शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तीवेतन यांचे आहरण, वितरण करण्यासाठीची परवानगी १५ बँकांना देण्यात आली आहे. यामध्ये Axis बँकेचा देखील समावेश केला आहे. Axis बँकेसह Federal बँक, Yes बँक, Kotak महिंद्र बँक, SBM बँक, IndusInd बँक, HDFC बँक, RBL बँक, ICICI बँक आदींचा समावेश करण्यात आला आहे.

या दरम्यान, Axis बँकेत अधिकारी असलेल्या अमृता फडणवीस यांच्या प्रभावामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शासनाच्या काही विभागांची खाती Axis बँकेत ओपन करण्यात आली, असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात आला होता, या आरोपावरून अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाल्या होत्या की, Axis बँकेत शासनाची खाती माझ्या लग्नाच्या आधीपासून आहेत, मी अधिकारी झाल्यापासूनची नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

या दरम्यान, ‘खासगी बँकांचे लाड कशासाठी, राष्ट्रीयीकृत बँका आहेत ना’ असा हल्लाबोल त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थात शिवसेना नेत्यांनी केला होता. तसेच, मुंबई आणि ठाणे महापालिकेची Axis बँकेतील खाती काढून घेण्याच्याही हालचाली झाल्या होत्या. आपला निधी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन फक्त राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली होती.