देशवासियांना राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम घरातूनच पाहता येणार

पोलिसनामा ऑनलाईन – अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला भूमिपूजन केले जाणार आहे. हा कार्यक्रम देशवासीयांना घरबसल्या बघायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे अयोध्येतून थेट प्रक्षेपण डीडी नॅशनल वृत्तवाहिनीवरून केले जाणार आहे.

राम मंदिराच्या पायाभरणीसाठी तारीख व वेळ निश्चित करण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमाविषयी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाविषयी ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र ज्या दिवशी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येत असतील, तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण असेल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून केले जाणार आहे. त्याचबरोबर इतर वाहिन्याही कार्यक्रमाचे प्रक्षेपण करणार आहेत, असे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने म्हटले आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते विनोद बन्सल यांनीही कार्यक्रमाविषयी ट्विट केले आहे. संत, विश्वस्त व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी पूजा करतील, असे म्हटले आहे. अयोध्येतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेशही योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.