राम मंदिर : भूमिपूजनानंतर लगेचच देशाला संबोधित करतील PM नरेंद्र मोदी, जाणून घ्या कार्यक्रमाची रूपरेषा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 5 ऑगस्टला रामजन्मभूमी परिसरातील भूमीपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्याच्या भूमीवरून देशाला संबोधित करतील. पंतप्रधानांच्या आधी आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे देखील संबोधन करतील. पंतप्रधानांच्या ठरलेल्या कार्यक्रमांनुसार ते फक्त आणि फक्त राम मंदिरासंदर्भातील कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधान राम नगरीत सुमारे तीन तास घालवतील.

पंतप्रधान मोदींच्या मिनिट-टू-मिनिट कार्यक्रमाची रूपरेषा

पंतप्रधान बुधवारी सकाळी 9:35 वाजता दिल्लीहून लखनऊला रवाना होतील. ते लखनऊच्या अमौसी विमानतळावर 10:35 मिनिटांनी पोहोचतील. येथून 10:40 वाजता ते हेलिकॉप्टरने अयोध्याच्या साकेत कॉलेजमध्ये बनवलेल्या हेलिपॅडवर उतरतील. जवळपास साडेअकरा वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत असतील. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडून केले जाईल. त्याअंतर्गत साकेत महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, जिल्हाधिकारी अनुजा झा यांच्यासह ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय त्यांचे स्वागत करतील.

यानंतर राम जन्मभूमीवर स्वागताची जबाबदारी अयोध्याचे राजा विमलेंद्र मोहन, राम मंदिर इमारत समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा आणि ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांच्याकडे असेल. यानंतर ते हनुमानगढी येथे पूजा केल्यानंतर पारिजातचे एक झाड लावतील. यानंतर पंतप्रधान मोदी भूमीपूजन कार्यक्रमात भाग घेतील. शुभ मुहूर्त 32 सेकंदाचा आहे, जो दुपारी 12 वाजून 44 मिनिट 8 सेकंदापासून 12 वाजून 44 मिनिट 40 सेकंद दरम्यानचा आहे. याच मुहूर्तावर पंतप्रधान चांदीच्या वीटांनी राम मंदिराची पायाभरणी करतील. यानंतर आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे व्यासपीठावरून संबोधित करतील. यानंतर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतील.

अशोक सिंघल यांचे पुतणे सलील सिंघल बनतील यजमान

5 ऑगस्ट रोजी भूमिपूजनाच्या वेळी शिलालेखाचे अनावरणही होईल. तसेच टपाल तिकीटही जारी केले जाईल. मंचावर पीएम मोदी यांच्यासह महंत नृत्य गोपालदास, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सीएम योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित असतील. या दरम्यान अशोक सिंघल यांचे पुतणे सलील सिंघल यजमान बनतील.