प्रेमात अपयश आल्यानं ‘राम जन्मभूमी’ ठाण्यात तैनात महिला पोलिसानं केली प्रियकर पोलिसाची हत्या

अयोध्या : राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात तैनात पोलीस कर्मचारी योगेश चौहानच्या हत्येचा खुलासा इटावा पोलिसांनी केला आहे. या हत्याकांडाची मुख्य सूत्रधार योगेशची प्रेयसी कॉन्स्टेबल मंदाकिनी चौहान असल्याचे उघड झाले आहे. तिच्या दोन सख्ख्या बहिणींसह दोन भाडोत्री गुन्हेगारांना सुद्धा अटक केली आहे. प्रेमात यश न आल्याने मंदाकिनीने आपल्या दोन मोठ्या बहिणींसोबत मिळून योगेशचे डोके ठेचून त्याची हत्या केली आणि नंतर मृतदेह खड्ड्यात टाकून दिला. आरोपी महिला पोलीस कॉन्सटेबल मंदाकिनीची मोठी बहिण सुद्धा आगरा पोलिसात हेड कॉन्सटेबल आहे. तिचाही या हत्येत सहभाग आहे.

माहितीनुसार, पोलीस दलात तैनात दोन बहिणींनी आपल्या मोठ्या बहिणीच्या मदतीने एका पोलीस कर्मचार्‍याची हत्या करण्याचा प्लॅन आखला. 7 ऑक्टोबरला कॉन्स्टेबल योगेश चौहान एक आठवड्याची सुटी घेऊन आपल्या मथुरा येथील घरी आला होता. इटावामध्येच तिन्ही बहिणींनी आणि त्यांच्या दोन साथीदारांनी मिळून एखाद्या जड वस्तूने योगेशच्या डोक्यात घाव घालून त्याला ठार केले आणि नंतर त्याचा मृतदेह लवेदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून दिला. मृत पोलीस कर्मचारी बेपत्ता असल्याची तक्रार अयोध्याच्या राम जन्मभूमी आणि मथूरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

असा केला तपास
काही दिवसानंतर एक बेवारस मृतदेह सापडला आणि त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. यानंतर एक-एक धागे जुळत गेले आणि हत्याकांडाचे हे प्रकरण उघड झाले. पोलिसांनी या हत्याकांडात सहभागी पोलीस कर्मचारी, मंदाकिनी, तिची मोठी बहिण मीना आणि त्यांच्या अन्य एका बहिणीसह दोन तरूणांना अटक केली. पोलिसांनी घटनेत वापरलेली कार देखील जप्त केली आहे. पाचही आरोपींची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. पोलीस दलात झालेल्या या मोठ्या घटनेने अयोध्या पोलीस सुद्धा हैराण आहेत.