राम मंदिर सुनावणीला पुन्हा कोर्टाची तारीख ; ‘या’ तारखेला होणार सुनावणी 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन  – हिंदू धर्मियांसाठी पवित्र असलेल्या राम मंदिराच्या जागी मुघली सत्तेचा संस्थापक बाबर याने सन  १५२७ मध्ये  मंदिर पाडून मशीद बांधली असा दावा हिंदू पक्षकरणाकडून केला जातो. बाबरी मशिदच्या तीन घुमटा पैकी मध्यभागी असलेल्या घुमटा खाली रामाचे जन्म स्थळ असल्याची हिंदू आस्था आहे म्हणूनच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालया समोर न्यायप्रविष्ठ आहे. आज सकाळी १०.३० वाजल्या पासून खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु करण्यात आली. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे घटनापीठाचे अध्यक्ष असून त्यात शरद बोबडे, एन. व्ही. रमण, उदय उमेश लळित आणि धनंजय चंद्रचूड या न्यायाधीशांच्या घटनापीठा समोर हि सुनावणी पार पडली आहे.  या खटल्याला आता २९ जानेवारी हि तारीख देण्यात आली आहे.

काय आहे बाबरी मशीद/राम मंदिर विवाद मुद्दा

अयोध्येमधील २.७७ एकर क्षेत्रफळाच्या जागेवर  सुन्नी वक्फ बोर्ड, आणि राम लल्ला न्यास यांच्यात विवादित जागेचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांनी बाबरी मशीद पाडली त्यानंतर हा खटला अत्यंत संवेदनशील झाला.  अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०११ साली या विवादित जागेची विभाजन करणारा निकाल दिला.  या विवादित जागेची विभागणी सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला न्यास अशा समान तीन भागात करण्यात आली. या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एकूण १४ अपिले करण्यात आली. त्या सर्व अपिलावर न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेतली आहे.  जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यावर सुनावणी होईल असे जाहीर केले गेल्यानंतर ४ जानेवारीला सुनावणी घेण्यात आली.  आता आज १० जानेवारीला  या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्याचे  सर्वोच्च न्यायालयाने ठरले आहे.  आज सुनावणी दरम्यान पुन्हा २९ जानेवारीची तारीख देण्यात आली आहे.