Ayodhya Verdict : आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करतो पण संतुष्ट नाही : मुस्लिम पक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा ही रामलल्लाची असल्याचे सांगत या जागेवर मंदिर उभारण्यासाठी येत्या 3 महिन्यात ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याच बरोबर मुस्लिमांना अयोध्येतच 5 एकर जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयाविषयी मुस्लिम पर्सनल लॉ पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील झफर्याब जिलानी यांनी या निर्णयाविषयी असमाधान व्यक्त केले आहे. त्यांनी म्हंटले आहे की, ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. परंतु आम्ही यावर समाधानी नाही. निकालात विरोधाभास आहे. आम्ही यासंदर्भात पुढील कार्यवाहीचा विचार करू. आम्ही पुनर्विचार करण्याची मागणी करू. पूर्ण निर्णय वाचल्यानंतरच, आम्ही पुढील धोरण बनवू. ही जमीन एकाच पक्षाला देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आम्ही निराश आहोत.

प्रश्न ५ एकर जमिनीचा नसून मशीदीसंदर्भातला आहे, आम्ही मशीद कुणालाही देऊ शकत नाही. मशीद असलेल्या जागेवरून हटवली जाऊ शकत नाही. ‘तसेच देशातील जनतेने संयम बाळगून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय –

पुरातत्व विभागाचे दावे कोर्टाने ग्राह्य धरत प्रभू रामाचा जन्म अयोध्येतलाच, याबाबत कोणताही वाद नाही हे मान्य केले आहे. तसेच फैजाबाद कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या जागेवर दावा सांगणारा कोणताही पुरावा सुन्नी वक्फ बोर्डाला सादर करता आला नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

वादग्रस्त जागा ही रामलल्लाची असल्याचे सांगत या जागेवर मंदिर उभारण्यासाठी येत्या 3 महिन्यात ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्याच बरोबर मुस्लिमांना अयोध्येतच 5 एकर जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Visit : Policenama.com