अयोध्या प्रकरणात  न्या. ललित यांची माघार ; पुढील सुनावणीत ते न्यायाधीश नसणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येच्या विवादित जागेवर राम मंदिर कि बाबरी मशीद या प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ठरणार असताना न्यायालयाने मात्र या खटल्याला तारीख पे तारीख या जुमल्यात गुंतवून ठेवले आहे. या खटल्याची सुनावणी आज पार पडली आहे. आज झालेल्या सुनावणीत या खटल्याच्या सुनावणीसाठी २९ जानेवारीची तारीख देण्यात आली आहे. उदय उमेश ललित या न्यायमूर्तीनी या खटल्याच्या न्यायपीठातून बाहेर पडण्याचे ठरवले असल्याने आता नव्या घटनापीठा समोर या खटल्याची सुनावणी करण्यात येणार आहे.

आज गुरुवारी सकाळी १०. ३० वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय न्यायपीठा समोर सुनावणी घेण्यास सुरुवात झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे  अध्यक्ष असलेल्या घटनापीठात  शरद बोबडे, एन. व्ही. रमण, उदय उमेश ललित आणि धनंजय चंद्रचूड यांचा समावेश होता. सुनावणी सुरु होताच मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी न्यायालयात युक्तिवाद सुरु करण्याची मागणी न्यायपीठासमोर केली. त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपण आता या खटल्याच्या पुढील तारखा ठरवणार असून या खटल्याची काल मर्यादा हि निश्चित करण्याच्या दृष्टीने चर्चा करणार आहोत.

त्यानंतर राजीव धवन यांनी न्या. उमेश उमेश ललित  यांच्यवर आक्षेप घेणारा मुद्दा उपस्थित केला. ललित यांनी वकील म्हणून काम करत असताना बाबरी मशीद विवादातील एका आरोपीचे वकीलपत्र घेऊन न्यायालयात बाजू मांडली होती म्हणून त्यांना या खटल्यात न्यायाधीश म्हणून ठेवणे योग्य राहणार नाही असे राजीव धवन यांनी न्यायालयात म्हणले. या नंतर  न्या. ललित यांनी हि या खटल्याच्या सुनावणी पासून दूर राहण्यासाठी आपण तयार असल्याचे म्हणले त्यानंतर सरन्यायाधीश राजन गोगोई यांनी २९ जानेवारी पर्यंत सुनावणी पुढे ढकलत असल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालय हि आपल्या  निकालावर विवाद निर्माण होऊ नये म्हणून सर्वतोपरी खबरदारी घेते आहे.