राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी महंत नृत्य गोपाल दास यांची निवड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची आज दिल्लीत पहिली बैठक झाली. या बैठकीत महात्त्वाचे निर्णय झाले. बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी आणि विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. मंदिराचे बांधकाम कधीपासून सुरु करायचे ? यावर या बैठकीत निर्णय झालेला नाही. आता पुढची बैठक अयोध्येत होणार असून या बैठकीमध्ये मंदिराचे काम सुरु करण्याची तारीख ठरवली जाणार आहे.

नृपेंद्र मिश्रा भवन निर्माण समितीचे अध्यक्ष
दिल्लीत आज झालेल्या बैठकीमध्ये भवन निर्माण समितीही बनवण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली. तसेच अयोध्येतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ट्रस्टचे खाते उघडण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

अयोध्येतील बैठकीत ठरणार बांधकामाचा मुहूर्त
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवळकर यांचाही जन्मदिन आहे. आजच्या विजय एकादशीच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टची पहिली बैठक झाली आणि महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. आता 15 दिवसांच्या आत आणखी एक बैठक होईल. या बैठकीत राम मंदिराचे बांधकाम कधीपासून सुरु करायचे हे निश्चित केले जाईल, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद गिरी यांनी दिली.

You might also like