राम मंदिरसाठी देणगी अभियानाची सुरुवात, राष्ट्रपती कोविंद यांनी दिला तब्बल ‘एवढ्या’ रक्कमेचा चेक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्यामध्ये तयार होत असलेल्या राम मंदिरसाठी समर्पण निधी अभियानाची सुरुवात आजपासून झाली आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वप्रथम 5 लाख 100 रुपयांचा समर्पण निधी दिला. यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांच्यासह व्हीएचपीच्या मोठ्या नेत्यांनी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

राम मंदिर बांधकाम निधी अभियानाच्या सुरूवातीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि विश्व हिंदू परिषदेसह अनेक संघटनांचे पदाधिकारी आज राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी, भवन बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, व्हीएचपी कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार, आरएसएसचे दिल्ली प्रांत अध्यक्ष कुलभूषण आहूजा यांनी भेट घेतली.

राम मंदिर बांधकामासाठी अहमदाबादचे हिरे व्यापरी गोविंदभाई ढोढाकिया यांनी 11 कोटी रुपयांची देणखी दिली आहे. गोंविदभाई ढोढाकिया मोठ्या कालावधीपासून आरएसएसशी संबंधित आहेत.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री विनायकराव देशमुख यांना एक लाख रुपयांचा चेक दिला. रायबरेलीचे सुरेंद्र सिंह यांनी एक कोटी रूपयांची देणगी दिली.

27 फेब्रुवारीपर्यंत देणगी गोळा करण्याचे अभियान
राम मंदिरसाठी देणगी जमवण्याचे अभियान आजपासून सुरू झाले आहे. हे अभियान 27 फेब्रुवारीपर्यंत चालवले जाईल. अभियानांतर्गत राम मंदिराच्य बांधकामासाठी विश्व हिंदू परिषद लोकांचे समर्पण आणि सहयोग रक्कम घेईल. या दरम्यान, 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपयांचे कुपन असेल. 2000 रुपयांपेक्षा जास्त सहयोग देणार्‍यास रिसिट दिली जाईल. या देणगीच्या माध्यमातून अयोध्यामध्ये भव्य राम मंदिराची निर्मिती होणार आहे.