Coronavirus : ‘कोरोना’बाधित रुग्णांवर ‘उपचारा’साठी CM ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रापुढे कोरोना विषाणूचे संकट उभे ठाकले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस लढा देत आहेत. राज्य सरकारकडूनही वेळोवेळी नवनवीन बदल केले जात आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर आता आयुर्वेदिक उपचार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी एक आयुर्वेदिक डॉक्टरांची टास्क फोर्स तयार केली आहे. या टीममध्ये माजी महापौर शुभा राऊळ आणि इतरही आयुर्वेदिक डॉक्टरांचा समावेश असणार आहे. ही डॉक्टरांची टीम डॉ. तात्याराव लहाने यांच्या अंतर्गत काम करणार आहे. राज्यभरात अशा पद्धतीने रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार केले पाहिजे, या संदर्भात ही टास्कफोर्स एक नियमावली ठरवणार आहे.

तसंच रुग्णांना कोण कोणतं आयुर्वेदिक औषध वापरले पाहिजे आणि ती औषध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी ही टास्कफोर्स काम करणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण सर्वाधिक आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत.

यापूर्वी लीलावती हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. सुरुवातीला एका रुग्णावर हा प्रयोग यशस्वीही झाला होता. परंतु उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोना बाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर व्हावा अशी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे.