उद्या ठरणार पतंजलीच्या ‘कोरोनिल’चं भवितव्य, केंद्राकडून परवानगी तर हायकोर्टात बंदीची मागणी

डेहराडून : वृत्तसंस्था – योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीने तयार केलेल्या कोरोनिल हे औषध अद्यापही वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. एकिकडे केंद्रीय आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध म्हणून या औषधाच्या विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे या औषधावर बंदी घालावी अशी मागणी उत्तराखंडच्या उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे आणि स्पष्टीकरण मागितलं आहे. रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी 23 जून रोजी पतंजलीचं कोरोनिल हे औषध लाँच केलं. या औषधामुळे कोरोना शंभर टक्के बरा होतो, असा दावाही त्यांनी केला होता.

यानंतर केंद्रीय आयुष मंत्रालय आणि उत्तराखंडच्या आयुष विभागाने पतंजलीला नोटीस बजावली. या नोटीसला उत्तर देताना पतंजली आयुर्वेदने देखील आपण कोरोनाचं औषध बनवल्याचा दावा केलाच नाही, अस म्हणत यू-टर्न घेतला. मात्र, आपलं औषधाने कोरोनावर उपचार करता येऊ शकतात असं सांगितलं. यानंतर केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या दिव्य योग फार्मसीला हे औषध इम्युनिटी बुस्टर म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध म्हणून विक्री करण्यास सशर्त परवानगी दिली. त्यावर कोरोनाचा उल्लेख नसावा असं सांगण्यात आलं. शिवाय आयुष मंत्रालयाच्या गाइडलाईन्सनुसार औषधाचं क्लिनिकल ट्रायलही सुरु ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. तर दुसरीकडे कोरोनिल विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या औषधाला बाजारात बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या औषध कंपनीने आयसीएमआरच्या गाइडलाइन्सचं पालन केले नाही आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाची परवानगी घेतलेली नाही. शिवाय उत्तराखंड आयुष विभागानेही कोरोना औषधासाठी परवानगी दिली नाही. तसेच ज्या राजस्थानच्या निम्स रुग्णालयात या औषधाचं ट्रायल घेतल्याचं सांगितलं जात आहे, त्यांनी देखील आपण अशा औषधाचं क्लिनिकल ट्रायल केलं नसल्याचं सांगितलं असल्याचे याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे औषधाची विक्री थांबवण्याची आणि खोटा प्रचार केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून बुधवारी स्पष्टीकरण मागितलं आहे. आता केंद्र सरकारने या औषधाच्या विक्रीला परवानगी दिली आहे. उद्या सरकार कोर्टात काय स्पष्टीकरण देते हे बघणे महत्त्वाचे आहे.