अर्थसंकल्प २०१९ : आरोग्यासाठी अर्थमंत्र्यानी ‘आयुष्यमान भारत’ चेच आयुष्य वाढवले 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज २०१९ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी बोलताना ‘आयुषमान भारत’  योजनेची आठवण पियुष गोयल यांनी करून दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले या योजनेच्या माध्यमातून तब्बल १० लाख रुग्णांना याचा फायदा मिळाला. यंदाच्या अर्थसंकल्पात पियुष गोयल यांनी आरोग्यासंदर्भात नव्या मोठ्या घोषणा करण्याऐवजी ‘आयुष्यमान भारत’ योजना २०३० पर्यंत कशी पूरक आहे हेच सांगितले.

यावेळी बोलताना गोयल म्हणाले, आयुषमान भारत योजनेतून गरिब रुग्णांचे तब्बल ३ हजार करोड रुपये वाचले आहेत. तसेच देशात सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या माध्यमातून स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचा लाखो-करोडो जनतेने फायदा घेतला असल्याची माहिती गोयल यांनी यावेळी सभागृहात दिली.

देशात सध्या २१ एम्स रुग्णालये सुरु आहेत. त्यापैकी १४ एम्स आम्ही सुरू केली असून आता २२ वे एम्स देखील लवकरच हरियाणामध्ये सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.आम्ही देशातील सर्वात मोठी स्वास्थ्य योजना आयुष्यमान भारत गोरगरिबांना उपलब्ध करून दिली. त्याद्वारे ५० कोटी लोकांवर उपचार करण्याची व्यवस्था केली. असे पियुष गोयल यांनी सांगितले.

एकूणच काय यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकार ने आणलेली ‘आयुषमान भारत’ कशी सर्वोत्तम आहे  हेच पटवून देत स्वत:वर स्तुतीसुमने उधळून घेतली.