Ayushman Bharat Yojana : फायद्याची गोष्ट ! आता आयुष्यमान कार्ड मिळतेय मोफत, उपचारासोबतच मिळते 5 लाखांचे विमा कवच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय़ घेतला आहे. आता या योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे आयुष्मान कार्ड मोफत मिळू शकतं. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावं लागणार नाही. याआधी आयुष्मान कार्डसाठी ३० रुपये घेतले जात होते. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून लाभार्थी मोफत उपचार घेऊ शकतात. लाभार्थ्यांना आय़ुष्मान भारत कार्ड देशभरातील कॉमन सर्विस सेंटरवर मिळते. मात्र या कार्डचे डुप्लिकेट तयार करण्यासाठी १५ रुपये द्यावे लागतात.

सरकारने म्हटलं की, आयुष्मान कार्ड पीएम-जेएवाय अंतर्गत असलेल्या कोणत्याही रुग्णालयात मिळू शकते. आता हे कार्ड मोफत मिळणार आहे. आयुष्मान कार्ड हे एका पीव्हीसी कार्डसारखं आहे. ते आता कागदी कार्डवर आणलं जात आहे. हे कार्ड सहजपणे अनेक वर्षे सांभाळून ठेवता येईल. लाभार्थ्यांना मोफत कार्ड देण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने घेतला आहे. या योजनेंतर्गत सेवा वितरणाची प्रक्रिया सहज आणि सोपी व्हावी यासाठी निर्णय घेण्यात आला.

१० कोटी कुटुंबांना विमा कवच
आयुष्मान भारत योजनेला अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. पंतप्रधान जन आरोग्य योजना, नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम किंवा मोदी केअर अशी नावे या योजनेला आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील 10 कोटी कुटुंबांना वर्षाला 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जात आहे.

कोणती कागदपत्रे लागतात ?
योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला गोल्डन कार्ड तयार करायचं असेल तर त्यासाठी योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयाशी संपर्क करा. ग्रामीण भागात कार्ड तयार कऱण्यासाठी जनसेवा केंद्र उभारण्यात आली आहेत. याठिकाणी तुम्ही कार्ड तयार करून घेऊ शकता. कार्ड तयार करण्यासाठी याआधी 30 रुपये द्यावे लागत होते मात्र आता मोफत मिळणार आहे. कार्डसाठी तुम्हाला रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाइल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल. विवाहित

महिलांसाठी नवीन तरतूद
आयुष्मान भारतमध्ये एक नवीन तरतूद करण्यात आली आहे. यानुसार योजनेअंतर्गत असलेल्या कुटुंबामध्ये सून आल्यास तिला मोफत आरोग्य सेवेचा फायदा घेण्यासाठी कार्ड किंवा कागदपत्रांची आवश्यकता नाही. या महिलांना पतीचं आधार कार्ड दाखवून योजनेचा लाभ घेता येईल. याआधी लग्न झालेल्या महिलेकडं विवाह प्रमाणपत्र असणं गरजेचं होतं.

आयुष्मान कार्डचे फायदे
आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशातील दहा कोटी गरीब कुटुंबांना कर्करोगासह १३०० हून जास्त आजारांवर मोफत उपचार आणि प्रत्येक कुटुंबाला विमा सुरक्षा दिली जात आहे. जर तुमचे नाव या योजनेंतर्गत येत असेल आणि तुम्हालाही याचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असणं गरजेचं आहे.