बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्याविरुद्ध पंजाब हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरला होता. तेव्हा कडाक्याच्या थंडीत मोदी सरकारने शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा केला तरी सुद्धा शेतकरी मागे हटला नाही. आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ताकद वाढवणारा असून तो देशाला दिशा देणारा ठरणार आहे. मोदी सरकारने कामगार व शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला घातल्याने तुमचा सातबारा (७/१२) भांडवलदांराच्या नावावर करण्याचा डाव रचला जात असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी कामगार मोर्च्याने आंदोलन केले. तेव्हा बाळासाहेब थोरात बोलत होते. ते म्हणाले, मोदी सरकारने कोणाशीही चर्चा न करता पाशवी बहुमताच्या आधारावर हे कायदे मंजूर करुन घेतले. संसदेत चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या खासदारांना निलंबित करुन कायदे मंजूर केले.

या कायद्याविरुद्ध देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असून देशाच्या विविध भागातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या कायद्यात आधारभूत किंमत नाही, बाजार समित्या नष्ट होणार आहेत, रेशन दुकानेही संपुष्टात येणार आहेत. हे कायदे फक्त भांडवलदार, साठेबाज, नफेखोरांसाठी आहेत, ते रद्द झालेच झालेच पाहिजे ही आमची मागणी आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे, असेही थोरात यांनी म्हटलं.

यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शेकापचे जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते, माजी मंत्री नसीम खान, भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबु आझमी, डाव्या पक्षांचे नेते अशोक ढवळे, नरसय्या आडम, अजित नवले, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, खा. कुमार केतकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, रामकिशन ओझा, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह विविध संघटनांचे नेते व हजारो शेतकरी उपस्थित होते.