जयाप्रदा त्यांच्या ठुमक्यांनी रामपूरमधील संध्याकाळ रंगीन करतील

सपा नेत्याची जीभ घसरली

लखनौ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीत प्रत्येकजण एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. मात्र, बोलण्याच्या ओघात आपण काय बोलतो याचे भान या नेत्यांना राहत नाही. अभिनेत्री व माजी खासदार जयाप्रदा यांच्यावर टीका करताना सपाचे नेते व संभल जिल्ह्याचे अध्यक्ष फिरोज खान यांची जीभ घसरली आहे. जयाप्रदा यांच्या ठुमक्यांमुळे व घुंगरुंमुळे रामपूरमधील संध्याकाळ रंगीन करतील, असे वादग्रस्त वक्तव्य फिरोज खान यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना रामपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर याच मतदारसंघातून सपा नेते आझम खान हे देखील निवडणूक लढवत आहेत. फिरोज खान हे आझम खान यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांना जयाप्रदा यांच्याविषयी विचारले असता त्यांनी त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी केली.

‘मी एकदा बसमधून जात होतो. तेव्हा रस्त्याला खूप जास्त ट्राफिक झाले होते. मी बसमधून उतरून त्यांना बघण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं त्या ट्राफिक हटविण्यासाठी थोडे ठुमके लगावतील. आता निवडणूकीच्या माहोलात रामपूरच्या संध्याकाळ खूप रंगीन होणार आहेत. रामपूरचे लोकं खूप चांगले आहेत. ते मत सपालाच देणार पण त्यांना जी संधी मिळालीय त्याचा ते नक्की फायदा घेत त्यांच्या संध्याकाळ रंगीन करतील.’ अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांची मुलगी संघमित्रा मौर्यवर देखील टीका केली.

You might also like