‘पुलवामा हल्ल्याला राष्ट्रपती आणि पंतप्रधान जबाबदार’

लखनौ : वृत्तसंस्था – पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भारताचे ४४ जवान शहीद झाले आहेत. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरातून बदल्याची मागणी होत असताना समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी मात्र वादग्रस्त वक्तव्य करुन देशवासियांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

यावेळी अझम खान यांनी या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे. अझम खान म्हणाले की, “अशी एखादी घटना होणारच होती. “पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या स्वतःच्या राजकीय कामांसाठी देशातील तपास यंत्रणा, गुप्तचर यंत्रणांचा वापर करत आहेत. मोदींनी तपास यंत्रणांना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे जावई राबर्ट वाड्रा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मागे लावले आहे. तपास यंत्रणा वाड्रा, बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यासंबधी तपास करत आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न मागे पडला आहे. परिणामी पुलवामासारखा हल्ला होणारच होता. त्यामुळे या घटनेला मोदीच जबाबदार आहेत.”

आझम खान पुलवामा हल्ल्यासंदर्भात अशा प्रकारे बोल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. एकीकडे देश दुःखात बुडाला असताना आझम खान यांनी असे वक्तव्य करायला नको होते, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष सध्या सरकारसोबत उभे आहेत, परंतु आझम खान मात्र सरकारला दोषी ठरवण्यात व्यस्त असल्याचे बोलले जात आहे.