Corona Vaccine : 60 दिवसात 50 कोटी लोकांचं लसीकरण शक्य, अझीम प्रेमजी यांचा दावा

बंगळुरु : पोलिसनामा ऑनलाईन – देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे. ही मोहीम टप्प्याटप्याने सुरु आहे पण अगदी कमी कालावधीत जास्तीजास्त लोकांना लस देण्याचे मोठे आव्हान देशातील आरोग्य यंत्रणेवर आहे. त्या पार्श्वभूमीवर बंगळुरु चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्समध्ये आयोजित चर्चासत्रादरम्यान विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी या लसीकरणावर भाष्य केलं आहे.

ते म्हणाले की, कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता ६० दिवसांत ५० कोटी लोकांचं लीसकरण करणं शक्य आहे. त्यासाठी लसीकरण मोहिमेत खासगी क्षेत्राला सामावून घेतला पाहिजे. तसे झाल्यास फक्त दोन महिन्यात देशभरातील ५० कोटी लोकांचं लसीकरण केलं जाऊ शकतं असा दावा त्यांनी केला आहे.

सरकारने जर लवकरात लवकर खासगी क्षेत्राला सहभागी करुन घेतलं तर ६० दिवसांत ५० कोटी लोकांचं लसीकरण करण्याचा टप्पा आपण गाठू शकतो असं आश्वासन आम्ही देऊ शकतो. तसेच खासगी क्षेत्राच्या सहभागामुळे लसीकरणाच्या टक्केवारीला चांगली गती मिळेल असा विश्वास अझीम प्रेमजी यांनी व्यक्त केला आहे.

अझीम प्रेमजी म्हणाले की, कोरोनाचा वाढत प्रसार लक्षात घेता देशात वेळेत लस उपलब्ध झाली आहे. आता मोठ्या प्रमाणात ती पोहोचवण्याचं आव्हान आहे. खासगी क्षेत्राचा सहभाग यामध्ये मदतशीर ठरु शकतो त्यामुळे यांदर्भात केंद्र सरकारने विचार करावा अशी त्यांनी म्हंटल आहे. कोरोना लसीचा एक डोस सीरम इन्स्टिट्यूटकडून ३०० रुपये दराने मिळण्याची शक्यता आहे आणि रुग्णालयं, खासगी नर्सिंग होम प्रत्येक डोस १०० रुपये किंमतीने देतात. म्हणजे प्रत्येकी ४०० रुपये खर्चाने आपण जास्तीत जास्त लोकांना करोना लस देऊ शकतो,” असं अझीम प्रेमजी यांनी म्हटलं आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेसाठी कोरोना हा ‘वेक अप कॉल’ असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. देशभरात आतापर्यंत १ कोटी ११ लाख करोना योद्धे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लस देण्यात आली आहे.