रामदेव बाबांचे ‘विश्वासू’ आचार्य बाळकृष्ण यांचा ‘रुची सोया’ कंपनीला ‘रामराम’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आचार्य बाळकृष्ण यांनी रुची सोया कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. अन्य कामांमध्ये अधिक व्यस्त असल्याने राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता ते कंपनीत अकार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत राहणार आहेत.

पतंजलीने काही महिन्यांपुर्वी दिवाळखोरीत निघालेली रुची सोया ही कंपनी खरेदी केली होती. रूची सोया ही कंपनी तेल, सोयबिनचे पदार्थ आदि पदार्थांचं उत्पादन घेते. आचार्य बाळकृष्ण यांनी व्यस्त असल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळाने त्यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पदावरून कार्यमुक्त केले आहे. रूची सोया या पतंजली समुहाच्या कंपनीचा नफा जून तिमाहीमध्ये 13 टक्क्यांनी कमी झाला होता.

बुधवारी कंपनीकडून जून तिमाहीच्या निकालांची घोषणा करण्यात आली. यादरम्यान कंपनीच्या नफ्यात 13 टक्क्यांची घट होऊन तो 12.25 कोटी रूपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 14.01 कोटी रुपयांचा नफा झाला होता. जून तिमाहीमध्ये कंपनीच्या एकूण उत्पन्नातही घट झाली आहे. दरम्यान, कंपनीच्या पूर्णवेळ संचालकपदी कार्यरत असलेल्या राम भरत यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.