बाबा रामदेव यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘ही निव्वळ अफवा, योगपीठातील कोणत्याही कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा नाही’

पोलीसनामा ऑनलाइऩ – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. असे असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या हरिद्वारमधील पतंजली योगपीठामध्येही तब्बल 83 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु बाबा रामदेव यांनी हे वृत्त फेटाळले असून ही निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. बाहेरून आलेले काही लोक ॲडमिशनपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी अनेक जण आता आपापल्या घरीही गेले आहेत. पतंजलीतील कोणताही कर्मचारी कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

बाबा रामदेव म्हणाले की, पतंजलीतील कोणत्याही कर्मचा-याला कोरोनाची बाधा झाली नाही. IPD मध्ये नवे रुग्ण आणि आचार्यकुलममध्ये काही विद्यार्थी प्रवेशासाठी आले होते. आम्ही कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांअंतर्गत त्यांची चाचणी केली. त्यातील 14 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना आम्ही मुख्य परिसरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसेच आपण दररोज 5 ते 10 वाजेपर्यंत योग आणि आरोग्यासंबंधी लाईव्ह प्रोग्राम करत असल्याचे ते म्हणाले. आम्ही आमच्या येथे कोविड सेंटर्स उभारली आहे. चाचण्यांशिवाय आम्ही कोणालाही प्रवेश देत नसल्याचे ते म्हणाले.