Patanjali IPL 2020 : आयपीएलच्या ‘टायटल’ स्पॉन्सरशिपच्या स्पर्धेत ‘पतंजली’ची एन्ट्री !

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या टायटल स्पॉन्सरच्या स्पर्धेत आणखी एका कंपनीचे नाव समोर येत आहे. चीनी मोबाईल कंपनी वीवोने या वर्षी टायटल स्पॉन्सरमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीसुद्धा स्पर्धेत सहभागी झाली आहे. कंपनीने यासंबंधी दुजोरा सुद्धा दिला आहे.

पतंजलीचे प्रवक्ता एस. के. तिजारावाला यांनी म्हटले की, आम्ही यावर्षी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिप बाबत विचार करत आहोत, कारण आम्ही पतंजली ब्रँडला एका जागतिक व्यासापीठावर घेऊन जाणार आहोत. आम्ही भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्याची तयारी करत आहोत.

बाजार तज्ज्ञ सांगतात की, एका चीनी कंपनीला पर्याय म्हणून एक स्वदेशी ब्रँड म्हणून पतंजलीचा दावा खुप मजबूत आहे. परंतु, त्यांच्यामध्ये एक मल्टीनॅशनल ब्रँड म्हणून स्टार पॉवरची कमतरता आहे.

वीवोची माघार, आता कोण
भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनी मोबाइल कंपनी वीवोने यावर्षी टायटल स्पॉन्सरशिपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने सुद्धा यावर शिक्कामोर्तब केले. वीवो टायटल स्पॉन्सशिपसाठी दरवर्षी बीसीसीआयला 440 कोटी रुपये देते. कोरोना लॉकडाऊनमध्ये अन्य कंपनी वीवो एवढे पैसे देऊ शकणार नाही, असा विचारही बोर्डाने केला आहे.

या कंपन्यासुद्धा स्पर्धेत
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ऑनलाइन शॉपिंगमधील दिग्गज कंपनी अमेझॉन, फँटसी स्पोर्टस कंपनी ड्रीम 11 आणि टीम इंडियाची जर्सी स्पॉन्सर आणि ऑनलाइन लर्निंग कंपनी बायजूज सुद्धा यावर्षी टायटल स्पॉन्सरशिपच्या स्पर्धेत आहेत.