…तर लोकांचा भाजपवरील विश्वास उडेल : रामदेव 

अहमदाबाद : वृत्तसंस्था – विद्यमान रालोआ सरकारच्या काळात राममंदिराचा मुद्दा निकाली निघाला नाही, तर जनतेचा सत्ताधारी भाजपवरील विश्वास उडून जाईल, असा इशारा योगगुरू बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारला दिला आहे. योगगुरू रामदेव यांच्या हस्ते पतंजलीच्या येथील पहिल्या वस्त्रदालनाचे उद्घाटन झाले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राममंदिराच्या मुद्यावरून भाजपला हा इशारा दिला.

रामदेव बाबा म्हणाले, सद्य:स्थितीत केंद्र व उत्तर प्रदेश या दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार आहे. त्यामुळे या स्थितीत अयोध्येत राममंदिर अस्तित्वात आले नाही, तर लोकांचा भाजपवरील विश्वास उडून जाईल. ही गोष्ट सत्ताधारी पक्षासाठी चांगली ठरणार नाही. राममंदिर बांधण्याचे २ पर्याय आहेत. एक तर लोकांनी कायदा व न्यायालयाची तमा न बाळगता स्वत:च त्याचे बांधकाम सुरू करावे किंवा दुसरा सरकारने लोकशाहीची सर्वोच्च संस्था असलेल्या संसदेत कायदा तयार करून याचा मार्ग प्रशस्त करावा.

न्यायिक प्रक्रियेला खूप उशीर होत आहे. यामुळे जनतेला न्यायालयाच्या माध्यमातून हा वाद निकाली निघण्याची आशा नाही. परिणामी, मोदी सरकारला यासंबंधी एक अध्यादेश आणता येईल. देशवासीयांना अयोध्येत राममंदिर पाहावयाचे आहे. राम हा अल्पसंख्याक व बहुसंख्यकांमधील वादाचा विषय नाही. कारण ते दोघांचेही पूर्वज होते, असेही रामदेव म्हणाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like