बाबा रामदेव यांनी केला ‘कोरोना’ला नष्ट करण्याचा दावा, म्हणाले – ‘पतंजलीमध्ये औषधावरील शोध झाला पूर्ण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  संपूर्ण जगभरात कोविड-१९ सारख्या महामारीमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर खूप काळानंतर योगगुरु बाबाराम देव यांनी या विषाणूचा शंभर टक्के उपाय शोधल्याचा दावा केला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गिलोय आणि अश्वगंधा १०० टक्के प्रभावी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, बाबा रामदेव यांनी म्हटले आहे की पतंजलीने त्यांचे संशोधन पूर्ण केले आहे आणि ते लवकरच जगासमोर ठेवले जाईल. हे दोन्ही घटक देण्यात आलेले रूग्ण १०० टक्के बरे झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले आहे की, कोरोना व्हायरस शरीरात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण रोगप्रतिकारक यंत्रणेवर परिणाम करतो. त्यांनी दावा केला की, गिलोयचे सेवन केल्याने संक्रमण पूर्णपणे बरे होते.

बाबा रामदेव म्हणाले की, आयुर्वेदात कोरोना व्हायरसचा उपचार आहे. आयुर्वेद केवळ कोरोना विषाणूची लक्षणेच दूर करत नाही, तर मुळापासून हा संसर्ग दूर करू शकते. विशेष म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीच्या वैज्ञानिकांच्या एका गटाने एआयएसटी, जपानसह केलेल्या संशोधनात असेही आढळले आहे की, आयुर्वेदिक औषधी वनस्पती, अश्वगंधामध्ये कोविड-१९ शी लढण्याची क्षमता आहे.