बाबरी मशिद केस : उमा भारती, जोशी, आडवाणींसह 32 जणांना निर्दोष सोडण्याच्या विरोधात सुनावणी आज

नवी दिल्ली : अयोध्यामधील वादग्रस्त घुमट उद्ध्वस्त केल्याच्या प्रकरणात भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 दोषींना निर्दोष सोडल्याच्या विरोधात दाखल याचिकेवर अलहाबाद हायकोर्ट बुधवारी सुनावणी करणार आहे. ही याचिका आठ जानेवारीला अयोध्या येथील रहिवाशी हाजी महबूब अहमद आणि सैयद अखलाक अहमद यांच्याकडून दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर सुनावणी उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाद्वारे केली जाईल.

दोन अयोध्या रहिवाशांकडून अधिवक्ता आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे कार्यकारी सदस्य जफरयाब जिलानी यांच्याद्वारे दाखल याचिका मंगळवारी न्यायमूर्ती राकेश श्रीवास्तव यांच्या पीठाच्या समक्ष सूचीबद्द करण्यात आली. जिलानी बाबरी मशिद अ‍ॅक्शन कमिटीचे संयोजक सुद्धा आहेत. जिलानी यांनी म्हटले की, त्यांना न्यायालयात यासाठी जावे लागले कारण मागच्या वर्षी आलेल्या या प्रकरणाच्या निर्णयाच्या विरोधात सीबीआयने आतापर्यंत अपील दाखल केलेले नाही.

याचिकेत वादग्रस्त बांधकाम उद्ध्वस्त करण्याच्या प्रकरणात 30 सप्टेंबर 2020 च्या सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार यांच्यासह 32 आरोपींना निर्दोष सोडण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय चुकीचा आणि तथ्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

पुनरीक्षण याचिकेत अयोध्यामधील रहिवाशी असलेल्या या दोन याचिकार्त्यांनी म्हटले आहे की, याचिकाकर्ते या प्रकरणात साक्षीदार असण्यासह वादग्रस्त बांधकाम उद्ध्वस्त झाल्याच्या घटनेतील पीडित सुद्धा आहेत. याचिकेत सर्व 32 आरोपींना दोषी ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे.

बाबरी मशिद प्रकरणात 30 सप्टेंबर 2020 ला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती साक्षी महाराज, लल्लू सिंह, बृजभूषण शरण सिंह आणि महंत नृत्यू गोपाळदास यांच्यासह सर्व हयात 32 आरोपींना मुक्त करण्यात आले होते.