‘होय, बाबरी विध्वंस पूर्वनियोजितच, माझ्याकडे पुरावे होते’ : न्या. लिब्रहान !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बुधवारी लखनऊमध्ये विशेष CBI कोर्टीनं 28 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाबरी विध्वंस प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला. यात बाबरी मशीद पाडणं हा पूर्वनियोजित कट नव्हता तर ती उपस्थितांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती असं म्हणत न्यायालयानं या प्रकरणातील सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, साक्षी महाराज, साध्वी ऋतंभरा अशा अनेक बड्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणी तत्कालीन केंद्र सरकारनं नेमलेल्या न्यायालयीन आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती मनमोहन सिंह लिब्रहान यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, बाबरी कट रचूनच पाडली गेली. माझ्याकडे याचे सगळेच पुरावे होते असं लिब्रहान यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता या प्रकरणाला नवीन वळण लागणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

लिब्रहान यांचं नक्की म्हणणं काय ?

लिब्रहान यांचा दावा आहे की, त्यांच्यासमोर या प्रकरणाचे सबळ पुरावे होते. ते म्हणाले, “या प्रकरणाशी संबंधित जे पुरावे मझ्या समोर ठेवण्यात आले होते त्यावरून हे स्पष्ट होत होतं की, बाबरी मशीद पाडणं हा एक पूर्वनियोजित प्रकार होता. मला आठवतंय की उमा भारती यांनीही या घटनेची जबाबदारी घेतली होती. हे काम माणसांनीच कलेलं आहे.

काय होता लिब्रहान आयोग ?

बाबरी मशीद पाडल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारनं न्यायमुर्ती मनमोहन सिंह लिब्रहान यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली होती. तबब्ल 17 वर्षे या प्रकरणाचा तपास केल्यानंतर 2009 साली लिब्रहान आयोगानं आपला अहवाल सादर केला. या अहवालात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील संघातील अनेक बड्या नेत्यांवर बाबरी मशी पाडल्याचा आरोप होता. या नेत्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मशीद तोडण्याचं समर्थन केलं होतं. कारसेवर अयोध्येपर्यंत पोहोचणं हे काही अचानक नव्हतं. याशिवाय ते आपल्या इच्छेनं अयोध्येला आलेले नव्हते. हे सगळं पूर्वनियोजित होतं असंही यात नमूद केलं होतं.