भाजपला आणखी ‘बळ’ मिळणार, संपूर्ण पक्षच हातात ‘कमळ’ घेणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी भाजपात प्रवेश करणार आहेत. 17 फेब्रुवारीला यासाठी रांचीमध्ये एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी झारखंड विकास मोर्चाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप उपाध्यक्ष ओमप्रकार माथूर उपस्थित असतील.

बाबुलाल मरांडी यांची काल दिल्लीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली, यावेळी ओमप्रकाश माथूर देखील उपस्थित होते. याआधी शनिवारी बाबुलाल मरांडी यांनी अमित शाह यांची देखील भेट घेतली. झारखंड विकास मोर्चाने 11 फेब्रुवारीला केंद्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली आहे. यात झारखंड विकास मोर्चाचे भाजपात विसर्जनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. यानंतर ही माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येईल.

बाबुलाल मरांडी 14 वर्षांनंतर भाजपात प्रवेश करत आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मरांडी घरवापसीसाठी शुभेच्छा दिल्या. तर भाजप आमदार आणि माजी सी.पी. सिंह यांनी मरांडी यांच्या पक्ष प्रवेशाच्या निर्णयाचे स्वागत केले. ज्यांना भाजपची विचारसरणी मान्य आहे ते पक्षात सहभागी होऊ शकतात. भाजपमध्ये व्यक्तीवादाला स्थान नाही, पक्षात फक्त विचारधाराच महत्वाची आहे असेही सिंह म्हणाले.

2006 साली भाजपला राम राम ठोकत बाबुलाल मरांडी यांनी झारखंड विकास मोर्चाची स्थापनी केली होती. गेल्या डिसेंबरमध्ये झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. तेव्हात मरांडी घरवापसी करतील अशी चर्चा होती परंतु त्यांनी ही निवडणूक लढली आणि त्यांना 5 जागांवर समाधान मानावे लागेल. या निवडणूकीत भाजपला 12 जागा कमी झाल्याने राज्यातील सत्ता गमवावी लागली. सध्या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार आहे.