नाझी’ प्रेम कुटुंबाला भोवल …मुलाचे नाव ‘अ‍ॅडॉल्फ’… आणि तुरुंगवास     

लंडन : वृत्तसंस्था – कोणते ही आई वडील आपल्या मुलाचे नाव इतिहासात होऊन गेलेल्या क्रूर खलनायकाच्या नावावर ठेवणे पसंत करणार नाही. पण इंग्लंडमधील पालकांनी आपल्या मुलाचे नाव ‘अ‍ॅडॉल्फ’ ठेवले आहे .भूकाळात होऊन गेलेल्या या क्रूरकर्मा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरने साठ लाख ज्यू लोकांची कत्तल केली. आणि जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले होते.

थॉमस (२२) आणि  क्‍लॉडिआ पाटाटास (३८) असे या दाम्पत्याचे नाव आहे. हे इंग्लंड मधील बर्मिंगहॅम येथे राहतात. त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘अ‍ॅडॉल्फ’ ठेवले आहे. त्याला हे नाव दिल्यामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. अर्थात यामागे अजून एक कारण आहे .हे दोघे हिटलरच्या विचारसरणीचे समर्थन करणार्‍या संस्थेचे सदस्य असल्याने त्यांना ही शिक्षा झाली आहे.

हे दाम्पत्य  बंदी घालण्यात आलेल्या ‘नॅशनल अ‍ॅक्शन’ या नाझी विचारांच्या समूहाचे सदस्य असून, त्यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बर्मिंगहॅम मधील क्राऊन न्यायालयाचे न्यायधीश मेलबर्न इनमान यांनी थॉमसला साडेसहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. तर त्याची बायको क्‍लॉडिआला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. हे दाम्पत्य नाझी विचारांचे असून ‘नॅशनल अ‍ॅक्शन’मध्ये सक्रिय आहेत. ‘नॅशनल अ‍ॅक्शन’ला हत्याकांड, हिंसाचार घडवून या देशातील लोकशाही नष्ट करायची असून, त्यांना नाझी कायदे लागू करायचे आहेत!