Bad Breath causes : ‘या’ 8 कारणांमुळे येते तोंडातून दुर्गंधी, जाणून घ्या कशी होईल सुटका

पोलीसनामा ऑनलाइन – श्वासाची दुर्गंधी म्हणजे तोंडातून येणारी दुर्गंधी एक अशी समस्या आहे, जिच्यामुळे अनेक लोक त्रस्त असतात. ही समस्या होण्याची अनेक कारणे आहेत आणि यासाठी आपल्या काही रोजच्या सवयीसुद्धा कारणीभूत असतात. ही कारणे कोणती आणि या समस्येवर कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊयात.

1 अल्कोहल –
अल्कोहलचे सेवन केल्याने तोंडातून जास्त दुर्गंधी येते. दारूमुळे तोंड कोरडे पडते आणि बॅक्टेरिया तयार होतात. यास हॅलिटोसिस म्हणतात. तसेच कॉफी, मसालेदार पदार्थ आणि सिगारेटमुळेसुद्धा तोंड कोरडे पडते. या सवयी दूर करा.

2 जीभ –
जिभेवरील बॅक्टेरियांमुळेही श्वासाला दुर्गंधी येते. यासाठी ब्रश केल्यानंतर रोज जीभ स्वच्छ करा. मेटल टंग क्लीनरचा वापर करा.

3 सर्दी-खोकला
सर्दी, खोकला या ब्रोंकायटिससारख्या श्वसन संसर्गामुळेसुद्धा श्वासातून दुर्गंधी येते. हे बॅक्टेरिया कफमध्ये असतात. नाक बंद झाल्यानंतर तोंडाने श्वास घेतल्याने तोंड कोरडे पडते आणि दुर्गंधी येते.

4 सुका मेवा –
सुका मेवा खूप गोड असतो, ज्यावर बॅक्टेरिया सहज येतात. हे दातात अडकल्याने श्वासाला दुर्गंधी येऊ लागते. म्हणून हे खाल्ल्यानंतर ब्रश करा.

5 लो कार्ब डाएट –
लो कार्ब डाएट आणि जास्त प्रोटीन घेतल्याने नेहमी तोंडातून दुर्गंधी येते. यामुळे अशाप्रकारच्या डाएटमध्ये फॅट बर्न करण्याच्या प्रक्रियेत कीटोन नावाचा घटक तयार होतो. कीटोनमुळे श्वासाला दुर्गंधी येते. यामुळे असा आहार टाळा, च्युईंगम सेवन करा.

6 औषधं –
अँटीडिप्रेसेंट आणि अ‍ॅलर्जीसह 400 पेक्षा जास्त औषधे अशी असतात जी तोंडातील लाळेचा प्रवाह रोखतात. लाळ तोंडातील बॅक्टेरियांना दूर ठेवते. जर असे औषध घेत असाल तर द्रवपदार्थांचे सेवन वाढवा. तोंड स्वच्छ ठेवा.

7 टॉन्सिल स्टोन
टॉन्सिल स्टोन बॅक्टेरिया, अन्नपदार्थांचे छोटे कण, मृत पेशी, आणि कफने बनलेले असतात. हे तुमच्या टॉन्सिल आणि जिभेच्या मागच्या बाजूला अडकलेले असतात. यांच्यामुळे नुकसान होत नाही, पण श्वासाला दुर्गंधी येते. हे टाळण्यासाठी जेवल्यानंतर मिठाच्या पाण्याने गुळणी करा.

8 पचनशक्तीत बिघाड
कधी कधी आपण असे काही खातो, की ज्यामुळे सहज पचन होत नाही. यामुळे छातीत जळजळ, पोट फुगणे आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होते. या कारणामुळेसुद्धा तोंडातून दुर्गंधी येते. असे पदार्थ खाणे टाळा, जे पचनात अडचणी निर्माण करतील.