चिंताजनक ! दिवसभरात भारत इटलीला मागे टाकून पोहचू शकतो 6 व्या क्रमांकावर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या रुग्णांची संख्या वाढत असताना अजून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. चीनपाठोपाठ ज्या युरोपातील देशात कोरोनाचा मोठा कहर झाला होता. त्या इटलीला भारत आज दिवसभरात मागे टाकून जगातील कोरोनाबाधित देशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर जाणार आहे. त्यानंतर आठवड्याभरात भारत स्पेन आणि इंग्लडला मागे टाकून ४ थ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे. सध्या जगात ब्राझिल, रशिया आणि भारतात सर्वाधिक वेगाने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.

चीनमधील वुहान शहरात कोरोनाचा सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग होऊन तो जगभरात पोहचला. चीननंतर इटलीमध्ये त्याचा सर्वाधिक उद्रेक झाला होता. पण, त्यातून इटली आता सावरला असून तेथे आता कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. इटलीने पर्यटनास परवानगी दिली असून देशातील कॅसिनोही सुरु करण्यात आले आहेत. तेथील जगप्रसिद्ध संग्रहालये खुली करण्यात आली आहेत. असे असताना भारतात मात्र आता कोरोनाचा अधिकाधिक प्रादुर्भाव होताना दिसत आहे.

इटलीमध्ये आतापर्यंत एकूण २ लाख ३४ हजार १३ कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी केवळ ३८ हजार ४२९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. तेथील १ लाख ६१ हजार ८९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तेथील बरे होण्याचे प्रमाणे ८२ टक्के आहे. ४ जून रोजी इटलीत फक्त १७७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याचवेळी ९५७ रुग्ण बरे झाले आणि ८८ रुग्णांचा मृत्यु झाला होता. आतापर्यंत इटलीत ३३ हजार ६८९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. असे असले तरी इटलीतील जनजीवन आता पुन्हा मार्गावर येऊ लागले आहे.

या उलट भारताची स्थिती असून भारतात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात भारतात दररोज ८ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येतात. शुक्रवारी सकाळी भारतात २ लाख २६ हजार ७७० रुग्ण इतकी संख्या झाली आहे. इटलीपेक्षा ७ हजार २४३ रुग्ण कमी आहे. इटलीमध्ये केवळ शंभरापर्यंत रुग्णांची भर पडत आहे. हे पाहता आज दिवसभरात भारत इटलीला मागे टाकून सहाव्या क्रमांकावर जाणार हे निश्चित आहे.

त्यानंतर भारतापुढे पाचव्या क्रमांकावर इंग्लड (२ लाख ८१ हजार ६६१) आणि ४ थ्या क्रमांकावर स्पेन (२ लाख ८७ हजार १३३) पुढे आहेत. तिसर्‍या क्रमांकावर रशिया (४ लाख ४१ हजार १०८), दुसºया क्रमांकावर ब्राझिल (६ लाख १५ हजार ८७०), प्रथम क्रमांकावर अमेरिका (१९ लाख २४ हजार ५१) हे आहेत.

भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सध्या १६ दिवसात दुप्पट होत आहे. हे पाहता पुढील १६ दिवसांनी म्हणजे २० जून रोजी भारतातील कोरोना बाधितांची संख्या ४ लाखांहून अधिक असण्याची शक्यता आहे. इंग्लड आणि स्पेनमधील कोरोना बाधितांच्या संख्येत आता घट आली आहे. स्पेनमध्ये दररोज साधारण ३०० ते ४००  नवीन रुग्ण आढळून येत असून इंग्लडमध्ये दररोज १ हजार ८०० ते २ हजार नवीन रुग्ण आढळून येतात. हे पाहता़ पुढील तीन दिवसात इंग्लड स्पेनला मागे टाकून ४ थ्या क्रमांकावर जाईल आणि त्यानंतर पुढील ७ दिवसात भारत स्पेन आणि इंग्लडला मागे टाकून ४ थ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे.