घशातील खवखवीनं वैतागलात ? झोपण्यापूर्वी करा ‘हा’ सोपा घरगुती उपाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेकांना घशात खवखव होण्याची समस्या असते. तसं तर ही सामान्य बाब आहे. या समस्येसाठी अनेकजण मध चाटण्याचा सल्ला देतात. ज्येष्ठमध, आलं, लिंबाचा रस हेही चाखण्याचा सल्ला दिला जातो. यामुळंही अनेक समस्या दूर होतात. मधाच्या सेवनानं घशातील खवखव तर दूर होतेच शिवाय याचा फायदा खोकल्यासाठीही होतो. खास बात अशी की, झोपही चांगली लागते.

कसा होतो मधाचा फायदा ?

मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी मायक्रोबियल तत्व असतात. या तत्वांमुळं घशातील खवखव वाढवणारे बॅक्टेरिया कमी होतात. तुम्ही लेमन टी मध्येदेखील मध टाकून सेवन करू शकता. यानंही आराम मिळतो. अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, मधामुळं खोकला कमी होतो.

लहान मुलांसाठी मध खूप फायदेशीर

एका रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, ज्या लहान मुलांना दिवसा किंवा रात्री झोपताना खोकल्याची समस्या असते त्यांना झोपण्यापूर्वी एक चमचा मध चाटायला दिलं पाहिजे. मधाच्या सेवनामुळं लहान मुलांना झोप चांगली लागते. विशेष म्हणजे त्यांचा खोकलाही कमी होतो.

एका वर्षांखालील मुलांना देऊ नये मध

जी एका वर्षांखालील मुलं आहेत त्यांना मध देऊ नये. यात बोटुलिनम बीजाणू असातत जे अशा मुलांसाठी घातक ठरू शकतात. याशिवाय अशा एका वर्षांखालील लहान मुलांचं इम्युन सिस्टीमही कमजोर असते. त्यामुळं ते अशा नुकसानीपासून बचाव करू शकत नाहीत. मोठ्या किंवा वयस्क मुलांना यामुळं कोणतंही नुकसान होत नाही.