कुख्यात गुंड बादलच्या खुनामागील ‘ते’ कारण समजल्यावर पोलीसही चक्रावले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – येथील बैद्यनाथ चौकात कुख्यात गुंड बादल राजू गजभिये (वय २७) याचा काही जणांनी बुधवारी रात्री खुन केला होता. पूर्ववैमनस्यातून हा खुन झाला असावा, असा पोलिसांचा कयास होता. मात्र, जेव्हा त्याचा खुन करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा खुनामागील कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

बादल याचा गुन्हेगारी चेहराच आजवर लोकांसमोर आला होता. पण तो विकृतही असल्याचे समोर आले आहे. आई आणि आंतरजातीय विवाह केलेल्या भावाच्या पत्नीला तो त्रास देत असल्यामुळेच बादलच्या भावाच्या साल्याने साथीदाराच्या मदतीने हा खुन केल्याचे उघड झाले आहे.

नीलेश विनोद मेश्राम (वय २२), सन्नी भाऊराव बागडे (वय २३), उद्देश शालिक मेश्राम (वय २३), आदर्श ऊर्फ अ‍ॅक्शन अशोक जारोडे (वय २०) आणि रितिक ऊर्फ काल्या विक्की खोब्रागडे (वय १९, सर्व रा. रामबाग, इमामवाडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नीलेश हा या खुनाच्या कटाचा सुत्रधार आहे. तो बादलचा भाऊ आकाश याचा साला आहे. आकाशने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे बादल चिडून होता. आकाशच्या पत्नीला पाच महिन्याचे बाळ आहे. उन्हाचे दिवस असूनही तो कधी कूलर बंद करायचा तर कधी पाणी बंद करुन वहिनीला त्रास देत होता. ही बाब नीलेशला त्याची बहिण सांगायची. नीलेशने बादलला याबाबत खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याने नीलेशलाच मारहाण केली होती.

१० एप्रिल रोजी नीलेशच्या आईने बादलला समजाविण्याचा प्रयत्न केला. तू तुझ्या नवबाळंतीण वहिनीला त्रास का देतो असे विचारल्यावर त्याने नीलेशच्या आईलाही मारहाण केली होती. इतके दिवस आपल्या बहिणीचा दीर म्हणून तो बादलला सहन करीत होता. पण त्याने आईला मारहाण केल्यानंतर नीलेशने बादलचा काटा काढण्याचे ठरविले. नीलेशचा खास मित्र सन्नीलाही बादल मारायचा, त्रास द्यायचा, त्यामुळे तोही बादलचा काटा काढण्याचा विचार करीत होता. नीलेश, सन्नी यांनी आदर्शला आपल्या कटात सहभागी करुन घेतले. एक तलवार विकत घेतली व बादलच्या मागावर ते होते. बुधवारी रात्री साडेदहा वाजता बादल याच्या मित्राबरोबर बैद्यनाथ चौकात टपरीवर गेल्याचे त्यांनी पाहिले व ही संधी साधली.

पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर झालेला हा खुन व त्यानंतर टोळी युद्ध पुन्हा उद्भवण्याची शक्यता व्यक्त होत असलेल्या शंकेमुळे पोलिसांवर या खुनाचा छडा लावण्याचे आव्हान होते. बादलचा गेम त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीने नाही तर त्याच्याच नातेवाईकांनी केल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like