बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

उत्तराखंड :  पोलीसनामा ऑनलाइन –  चारधामापैंकी एक असलेल्या श्रीबद्रीनाथ मंदिराचे दरवाजे शुक्रवारी पहाटे 4.30 वाजता  उघडण्यात आले. सहा महिन्यांचा शीतावकाश संपल्यानंतर आज मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यासाठी बद्रीनाथाचे मंदिर आतून व बाहेरून फुलांनी सजवण्यात आले होते. लॉकडाउन सुरू असल्यामुळे या सोहळ्यात मोजकेच लोक सहभागी झाले. विधीवत पूजा करून मंदिराचे दरवाजे सगळ्या भक्तांसाठी खुले करण्यात आले.

बद्रीनाथमध्ये आज होणारं विष्णू सहस्त्रनाम पाठ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात येणार आहे. देशाला कोरोनातून मुक्त करण्याची प्रार्थना या वेळी करण्यात आली.दरवाजे उघडताना मुख्य पुजारी रावल, धर्माधिकारी भुवनचन्द्र उनियाल, राजगुरुंसोबत मोजकेच लोक होते. या वेळी मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आलं. पूजेआधी मंदिराचा परिसर संपूर्ण सॅनिटाइज करण्यात आला होता. दरवाजे उघडण्याआधी गर्भगृहातून लक्ष्मी मातेच्या मूर्तीची लक्ष्मी मंदिरात स्थापना करण्यात आली. तसंच कुबेर व उद्धव यांच्या चल विग्रह मूर्ती गर्भगृहात स्थापित करण्यात आल्या.