कोल्हापूर पोलिसांबरोबरील चकमकीनंतर ‘बिष्णोई’ टोळी गजाआड, किणी टोलनाक्यावर गोळीबारात टोळीप्रमुख गंभीर जखमी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राजस्थानमध्ये सामुहिक बलात्कार, जबरी चोरी, दरोडा असे २५ हून अधिक गुन्हे करुन पोलिसांची झोप उडविणाऱ्या बिष्णोई टोळीतील तिघांना कोल्हापूर पोलिसांनी किणी टोलनाक्यावरील चकमकीत जेरबंद केले आहे. त्यांच्यातील टोळीप्रमुख शामलाल बिष्णोई हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गँगस्टारांकडून गोळीबार झाला असतानाही कोल्हापूर पोलिसांनी त्याला प्रतिउत्तर देताना पोलीस मॅन्युअलप्रमाणे पायावर गोळीबार करुन गँगस्टरांना जायबंदी केले.

शामलाल गोवर्धन बिष्णोई (वय २२, रा. जोधपूर), श्रवणकुमार मनोहरलाल मांजू बिष्णोई (वय २४, रा. विष्णुनगर, बारखी, ता आसिया, जि़ जोधपूर) आणि कारचालक श्रीराम पांचाराम बिष्णोई (वय २३, रा. बेटलाईन जोधपूर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे असून कारचालक श्रीराम बिष्णोई याला अटक केली असून इतर दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

या टोळीची राजस्थानमध्ये मोठी दहशत आहे. खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लुटमार, खंडणी, सामुहिक बलात्कार असे दोन डझनहून अधिक गुन्हे या टोळीच्या नावावर आहे. त्यांनी जोधपूर परिसरातील व्यापारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांना ठार मारण्याची धमक्या देत त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडण्या उकळल्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून हे गुन्हेगार फरार होते. अनेक गुन्हे केल्यानंतर ते कर्नाटकात पळून गेले होते. कर्नाटकात त्यांनी धुमाकुळ घातल्यानंतर कर्नाटक पोलीस त्यांच्या मागावर होते.

राजस्थान पोलीस या गुन्हेगारांच्या मागावर होते. मंगळवारी सकाळी राजस्थान पोलिसांना हे तिघे गँगस्टर कर्नाटकातील हुबळीहून निघाले असल्याची माहिती मिळाली. त्यांनी बेळगाव पोलिसांना याची खबर दिली. त्यानुसार बेळगाव पोलिसांनी बेळगाव कोल्हापूर महामार्गावर त्यांच्या नंबर नसलेल्या पांढऱ्या कारला अडविण्याचा प्रयत्न केला. पण ते पळून गेले. त्यामुळे बेळगाव पोलिसांनी ही माहिती तातडीने कोल्हापूरचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला सूचना दिल्या.

नुसार तानाजी सावंत व त्यांच्या टिमने कागल टोल नाक्यांपासून उजळाईवाडी महामार्गावर दोन टीम सक्रीय ठेवल्या. तोपर्यंत ही कार कागल टोलनाक्यावरुन पुढे गेली होती. त्यानंतर तातडीने किणी नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली. रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी गँगस्टर किणी टोलनाक्यावर आले. तेथे पोलिसांची नाकाबंदी पाहून कारचालक श्रीराम बिष्णोई हा भांबावुन गेला. त्याने कार दुसऱ्या लेनमधून पुढे देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती दुभाजकावर आदळली. हे पाहताच हवालदार पांडुरंग पाटील यांनी कारवर दगड मारून झडप घातली. कारचे स्टेरिंग पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. इतरांनी कारला घेराव घातला. हे पाहिल्यावर आत बसलेले शामलाल व श्रवणकुमार हे खाली उतरले व त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली.

हे पाहून काही पोलीस महामार्गावरील रस्त्यावर आडवे झोपले शामलाल हा गोळीबार करीत शेजारच्या शेतात पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा पोलिसांनी त्याच्या पायावर गोळीबार केला. त्यात दोन गोळ्या त्याच्या पायाला लागून तो खाली कोसळला. श्रवणकुमारच्या ही पायावर गोळी झाडून त्याला जायबंद करण्यात आले. दोघांना तातडीने सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच कारचालक श्रीराम बिष्णोईला कारमध्ये असतानाच पकडण्यात आले.

अतिशय थरारकपणे कोल्हापूर पोलिसांनी तिघाही गुन्हेगारांना जिवंत पकडण्यात यश मिळविले आहे. या चकमकीची माहिती जोधपूर पोलिसांना कळविण्यात आली असून या तिघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक कोल्हापूरकडे येण्यास निघाले आहे. तब्बल ३ वर्ष जोधपूर पोलीस या गुन्हेगारांना पकडण्यासाठी प्रयत्न करीत होते. कोल्हापूर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ही टोळी हाताला लागली आहे.

फेसबुक पेज लाईक करा