एकनाथ खडसे पुन्हा एकदा नेतृत्वावर ‘बरसले’, म्हणाले – ‘बहुजन नेत्यांच्या पराभवाला पक्ष नव्हे तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेमध्ये 105 आमदार असून देखील भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. त्यामुळे भाजपमध्ये डावलले गेलेले नेते दुखावले गेले असून आता ते सक्रीय झाले आहेत. विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे या नेत्यांनी भाजपांतर्गत दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घतली. त्यानंतर खडसेंनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, दुर्दैवानं ओबीसी नेत्यांना डावलण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. बहुजन समाज आणि ओबीसीचं नेतृत्व करणारे नेते आहेत, तेच या ठिकाणी पराभूत झाल्याचे दिसतयं. पंकजा मुंडे यांचा पराभव असो किंवा बावनकुळे, तावडे, मेहतांना तिकीट न देण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. ओबीसी नेत्यांचा पराभवाची कारणं काय असतील ते नंतर तपासू. महाराष्ट्रात जे 105 आमदार आले त्यापेक्षा अधिक आले असते तर पुनर्रचना झाली असती, असे खडसे म्हणाले. तसेच ज्यांनी पक्षाविरोधात काम केले आहे त्यांची नावे चंद्रकांत पाटील यांना दिली आहेत. त्यांनी कारवाई करावी ही अपेक्षा आहे असंही खडसे म्हणाले.

तत्पूर्वी खडसे म्हणाले होते, भाजपसमोर काहीही आव्हान नाहीत, भाजप पक्ष सध्या तरी एकसंघ आहे. पक्षामध्ये एकजूट आहे आणि योग्य वेळी तुम्हाला दिसून येईल. जस जशा निवडणुका येतील, त्या त्या वेळी योग्य काय ते दिसून येईल. पंकजाताईंची भेट घेण्याची आवश्यता नाही. गोपीनाथ गडावर दरवर्षी जातो आणि आताही जाणार आहे. यावर्षीसुद्धा जाणार आहे असे एकनाथ खडसे म्हणाले होते.

Visit : policenama.com